जालोर : कुणाच्याही अंगावर ऐकून काटा येईल असा प्रकार समोर आला आहे. 25 वर्षांच्या तरुणाची भर रस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder of Youth in Jalor) करण्यात आली. रहिवाशांची वस्ती असलेल्या भागात भर रस्त्यात हा प्रकार घडला. या तरुणाच्या घरापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेहाला मुंडकंच नव्हतं. त्याच्या धडातून सतत रक्तप्रवाह सुरु होता. हा प्रकार कुटुंबीयांना समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. अत्यंत संतापात असलेल्या या कुटुंबीयांनी मृतदेह पोलिसांनीही ताब्यात घेऊ नये, असा हट्टा धरला. जागेवरच मृतदेह २४ तास पडून होता. जिल्ह्यातही या प्रकारानं खळबळ उडाली. 24 तास इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. कुटुंबीयांनी मृतदेहाच्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरु केलं. अखेरीस काही अटी प्रशासनानं मान्य केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. राजस्थानातल्या जालौरमध्ये हा भयानक प्रकार समोर आलाय. गुरुवारी हत्याकांड झालं आणि शुक्रवारी हे हत्याकांड का घडलं, याचं कारणही आता समोर आलेलं आहे.
एका कानशीलावरुन झाला एवढा मोठा राडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादरली गावात राहणाऱ्या किशोरसिंह भोमिया राजपूत याची भररस्त्यात अशी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येनंतर काही तासातंच मारेकरी स्वत:च्या पायाने चालत पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यापूर्वी या मारेकऱ्याचं कुटुंबीयांनी त्यांचं राहतं घर सोडलं होतं. त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचंही स्पष्ट झालंय.
मृत किशोरसिंह याच्या घराजवळच आरोपी सांकला राम भील हा राहत असल्याचं समोर आलंय. सांकरा राम आपल्या 10 वर्षांच्या नातवाला घेऊन घराबाहेरच्या अंगणात बसला होता. त्यावेळी किशोर सिंह त्या ठिकाणाहून जात होता. रागाच्या भरात त्यानं सांकला राम याच्या नातवाच्या कानशिलात मारली आणि सांकला रामला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरुन आजोबा साकंला राम यानं बुधवारी रात्री किशोर सिंह यांची गळा कापून थेट हत्या केली. गुरुवारी सकाळी सांकला रामचं पोलिसांपुढं शरणागती पत्करली
अतिरिक्त पोलीस दल तैनात
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीसही हादरले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं. कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी आणि गुन्हेगाराला तातडीनं अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलनही सुरु केलं. शहरात अनुचित प्रकार वाढू नयेत, अफवा पसरु नयेत यासाठी २४ तास इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. अखेरीस शुक्रवारी सकाळी किशोरसिंहच्या नातेवाईकांच्या अटी प्रशासनानं मान्य केल्या आणि त्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले. आता या प्रकरणात सांकला राम याची अधिक चौकशी करण्यात येते आहे.