गुजरातमध्ये 'आप' चा उदय कोणासाठी धोक्याची घंटा? भाजप की कॉंग्रेस?
भ्रष्टाचारविरोधी आंदोनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला आणि पुढे देशाच्या राजकारणात महत्त्वाचा पक्ष बनला. दिल्लीत सत्ता गाजवली, त्यांच्या योजनांची जगानेही दखल घेतली. मात्र दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात झालेल्या आरोपांमुळे आपला दिल्लीची सत्ता गमवावी लागली. एकाक्षणी असंही वाटतं होतं की आता आपला पुन्हा उभारी घेता येणं अशक्य आहे, मात्र गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये आपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, आपचा गुजरातमध्ये उदय नेमका कोणासाठी धोकादाय ठरणार आहे, दिल्लीची सत्ता हिसकावून घेतलेल्या भाजपसाठी की इंडिया आघाडीतील त्याचाच सहकारी कॉंग्रेसाठी, जाणून घेऊयात…
गुजरातमध्ये कादी आणि विसावदर या दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी काँग्रेससाठी धोक्याची घंटा दिली आहे. विशेषतः विसावदरमधून पाटीदार समाजाचे नेते गोपाल इटालिया यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला असून, ही काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरली आहे. कादीमध्ये मात्र भाजपने आपला गड राखला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधातील मोर्चा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असले तरी, राज्यातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेससाठी ही वाट अधिक कठीण मानली जात आहे.
2022 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अत्यंत निराशाजनक पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने विक्रमी 156 जागा जिंकत सत्ता पुन्हा काबीज केली, तर आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या. मात्र काँग्रेसला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. ‘आप’ने काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पारंपरिक मत फोडण्यात यश मिळवलं. मात्र या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकाणात दबदबा वाढत चालला आहे.
दिल्ली आणि पंजाबमध्ये यापूर्वी ‘आप’ने काँग्रेसची बहुतांश मतं मिळवत सत्तेचा मार्ग मोकळा केला. 2015 आणि 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचा ओघ ‘आप’कडे वळला होता, जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जात होता. गुजरातमध्येही असाच कल तयार होत असल्याचे संकेत आहेत. अनेक विश्लेषकांच्या मते, आम आदमी पक्ष भाजपला मोठ्या प्रमाणावर थेट नुकसान पोहोचवू शकला नाही, पण काँग्रेससाठी मात्र तो मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
2022 च्या निवडणुकांमध्ये जवळपास 50 जागांवर ‘आप’ आणि काँग्रेस यांच्या एकत्रित मतांची बेरीज भाजपपेक्षा अधिक होती. मात्र विरोधकांचं मत विभाजन झाल्याने भाजपला थेट फायदा झाला आणि त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. गुजरातमध्ये गेल्या तीन दशकांपासून भाजप सत्ता टिकवून आहे आणि या काळात एंटी-इनकंबेंसी म्हणजे सत्ताविरोधी लाट एक नैसर्गिक घटक बनला आहे. पण त्याचा उपयोग काँग्रेसपेक्षा ‘आप’ अधिक चतुराईने करत असल्याचं चित्र समोर येत आहे.
‘आप’च्या फ्री वीज, पाणी आणि शिक्षणाच्या वचनबद्ध घोषणा तरुण मतदारांना आकर्षित करत आहेत. शिवाय, काँग्रेस आणि भाजपमध्ये नाराज झालेल्या नेत्यांसाठी ‘आप’ हा पर्याय खुला असतो, ज्यामुळे मतांचे आणखी विभाजन होण्याची शक्यता वाढते.
Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?
तथापि, राज्यात पुढील विधानसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे या दरम्यान आम आदमी पक्षाला स्वतःचा संघटना विस्तार, योग्य उमेदवारांची निवड आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं कठीण काम करावं लागणार आहे. पण पोटनिवडणुकीचे ताजे निकाल पाहता हे स्पष्ट आहे की, गुजरातमध्ये ‘आप’चा प्रभाव वाढत असून काँग्रेससाठी ही स्थिती भविष्यात आणखी संकट निर्माण करू शकते. यामुळे काँग्रेसने जर वेळेत रणनीती आखली नाही, तर गुजरातच्या आगामी राजकारणात ती आणखी कमजोर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.