
वायुप्रदूषणामुळे वर्षाला २० लाख मृत्यू
नवी दिल्ली : देशात वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे गांभीर्य केंद्र सरकार नाकारत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फिक्की आणि ईवायच्या ताज्या अहवालानुसार, २०२३ मध्ये देशात वायुप्रदूषणामुळे सुमारे २० लाख नागरिकांचा मृत्यू झाला. हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या जवळपास २२ टक्के आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी या अहवालाचा हवाला देत मोदी सरकारवर टीका केली.
सरकार प्रदूषणासंदर्भातील अभ्यास अहवाल भारतकेंद्रित नसल्याचे सांगून फेटाळते. मात्र, पीएम २.५ चे वाढते प्रमाण देशातील अनेक भागांत जीवघेणे ठरत आहे. ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ पेक्षा नागरिकांना मोकळा श्वास घेता येणे अधिक महत्त्वाचे आहे, असे रमेश म्हणाले. दिवाळीतील आतिषबाजीमुळे दिल्लीतील प्रदूषणात मोठी वाढ झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी आयटीओ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ४०६, गाझीपूरमध्ये ४१८, तर राजीव चौकात ३८१ नोंदवण्यात आला.
वायूप्रदूषणामुळे भारताला दरवर्षी सुमारे १९ ते २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. पीएम २.५ चे सूक्ष्म कण श्वासावाटे फुफ्फुसांत आणि रक्तप्रवाहात पोहोचून गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात. २००९ ते २०१९ या काळात भारतातील संपूर्ण लोकसंख्या डब्ल्यूएचओच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक पीएम २.५ असलेल्या भागांत राहत होती, असे एका अभ्यासात आढळले आहे. प्रदूषणाची समस्या आता महानगरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण आणि औद्योगिक भागांतही पसरली आहे.
FAQ
१. भारतात वायुप्रदूषणामुळे किती मृत्यू झाले?
२०२३ मध्ये वायुप्रदूषणामुळे सुमारे २० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
२. हा अहवाल कोणत्या संस्थांनी प्रसिद्ध केला?
फिक्की आणि ईवाय या संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे.
३. वायुप्रदूषणामुळे एकूण मृत्यूंपैकी किती टक्के मृत्यू झाले?
एकूण मृत्यूंपैकी जवळपास २२ टक्के मृत्यू वायुप्रदूषणाशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद आहे.