मालीतून भारतीय नागरिकांचं अपहरण; सुटकेसाठी अल-कायदाने काय ठेवली मागणी? वाचा सविस्तर
पश्चिम आफ्रिकेतील माली देशात अल-कायदाशी संबंधीत दहशतवादी गटाने तीन भारतीय कामगारांचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. अपहरण झालेल्या तिघांमध्ये ओडिशामधील गंजाम जिल्ह्याचे पी. वेंकटरमण, आंध्र प्रदेशातील रामणा आणि तेलंगणामधील मिर्यालगुडा येथील अमरेश्वर यांचा समावेश आहे.या अपहरणामागे जमात नुस्रत अल-इस्लाम वल मुस्लिमीन (JNIM) या अल-कायदाशी संबधित गटाचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुटकेसाठी खंडणीची मागणी झाल्याचंही समोर आलं आहे. या घटनेने भारतात अपहरण झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Pakistan News: हाफिज सईद आणि मसूद अझहर भारताच्या ताब्यात देण्यास तयार? बिलावल भुट्टोंचे विधान
अपहरण झालेल्या वेंकटरमण यांच्या मेहुण्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मलाखतीत, “वेंकटने मला ३० जून रोजी शेवटचा फोन केला होता. तो मालीमधील एका सिमेंट फॅक्टरीत काम करत होता. तेव्हा त्याने सांगितलं की, दहशतवादी हालचालींमुळे कंपनीने त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जुलैला अपहरणाची घटना घडल्याचं म्हटलं आहे.
सुरुवातीला संबंधित सिमेंट कंपनीने कुटुंबियांना सांगितलं की, वेंकटरमण आणि काही इतर कामगार पोलीस ताब्यात आहेत कारण फॅक्टरीवर हल्ला झाला होता. पण नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून कळलं की अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी काही परदेशी नागरिकांचं अपहरण केलं आहे. या संदर्भात कुटुंबियांनी पुन्हा कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी अपहरणाची कबुली दिली आणि ही माहिती कुणालाही न देण्याची ताकीद दिली. “त्यांनी स्पष्ट सांगितलं की, दहशतवादी वेंकट आणि इतरांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी करत आहेत,” असं वेंकटरमण यांचे मेव्हणे म्हणाले.
या घटनेनंतर वेंकटचे नातेवाईक घाबरून गेले असून त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. “मी दूतावासाला मेल आणि फोन केले पण प्रतिसाद मिळालेला नाही. माझा मेव्हणा सुखरूप परत यावा, यासाठी मी सरकारकडे विनंती करतो,” अशी त्यांची भावनिक मागणी आहे.
ओडिशामधील स्थानिक प्रशासनाकडूनही या घटनेची तातडीने दखल घेण्यात आली आहे. गंजामचे उपजिल्हाधिकारी शिबाशीष बराल यांनी सांगितलं की, “अपहरणाची माहिती मिळताच आम्ही तातडीने कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत.”
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही १ जुलै रोजी घडलेल्या या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, मालीतील अनेक लष्करी व सरकारी ठिकाणांवर दहशतवाद्यांनी एकाच दिवशी समन्वयित हल्ले केले होते. त्याच दिवशी डायमंड सिमेंट फॅक्टरीवरही हल्ला झाला, आणि त्यानंतर तीन भारतीयांचा अपहरण झाला.
ही फॅक्टरी हैदराबादस्थित प्रसादित्य ग्रुपच्या मालकीची असून, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सध्या मालीमध्ये जाऊन स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कंपनीचे अध्यक्ष मोतपर्ती शिवरामप्रसाद यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
भारतीय दूतावास बामाको (मालीची राजधानी) येथे असून, तो स्थानिक पोलीस, सैन्य व कंपनीच्या व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तसेच अपहरण झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांशीही दूतावास संवाद साधत आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या मते, या अपहरणामागे ‘JNIM’ या अल-कायदाशी संबंधित गटाचा हात असण्याची शक्यता आहे. यापैकी कोणीही अद्याप जबाबदारी घेतलेली नसली, तरी गुप्तचर विभागांनी अपहृतांची ओळख निश्चित केली आहे.
सध्या या प्रकरणावर केंद्र सरकार, संबंधित राज्य सरकारे आणि कंपनीकडूनही हालचाली सुरू असून, अपहृत भारतीयांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कुटुंबीयांच्या मनात अजूनही चिंता, भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे. देशभरातून या अपहरणप्रकरणावर संताप व्यक्त होत असून, सरकारने तातडीने ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.