बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, अमित शाह यांचे आवाहन
मुंबई : ज्या देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र पूर्णपणे प्रगत झाले आहे. तोच देश जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. भारतालाही २०४७ पर्यंत सर्वच क्षेत्रात विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करावे लागणार आहे. त्यासाठी बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अर्थसहाय्य करावे, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
इंडियन एक्सप्रेस माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित ‘इंडियाज बेस्ट बँक्स’ पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले की, भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे. देशामध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. जग विकसित आणि विकसनशील अशा दोन भागात विभागले आहे. विकसित देश त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विकसनशील देश कर्जाने ग्रासले आहेत. मात्र भारत कल्याणकारी योजना, वित्तीय सुधारणा आणि खंबीर नेतृत्वामुळे विकासाची गाथा पुढे नेत आहे.
मागील दहा वर्षात ५६ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे ४४ लाख कोटी रुपयांचे विविध योजनांच्या लाभाचे वितरण थेट बँक खात्यात करण्यात येत आहे. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येकापर्यंत बँक जोडण्यात आली आहे. बँकांवरील कर्जाचा भार कमी करून एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट्स) २.५ टक्के ठेवण्यात यश आले आहे. बँकिंग तंत्रज्ञान सुधारण्यासाठी चार ‘आर’ वर काम करण्यात आले आहे. यामध्य रिकनाईझ, रिकव्हर, रिकॅपॅबिलिटीज आणि रिफॉर्म यांचा समावेश आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सांगितले की, बँकांनी मागील काळात झालेल्या वित्तीय सुधारणांचा अभ्यास करून शासनाला भविष्यातही काही सुधारणा करावयाच्या असल्यास त्या सुचवाव्यात. नुकत्याच केंद्र शासनाने वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये सुधारणा केल्या आहेत. कुठल्याही विक्री करामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कपात आहे. वित्तीय विषयक गुन्ह्यांमध्ये दंड अधिक करण्यात आला आहे. तसेच कायद्यांमध्ये बदल करून बँकिंग सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यात आल्या आहेत .
देशात डिजिटल उत्क्रांती होत असून प्रति सेकंद ५ हजार ८०० पेक्षा जास्त डिजिटल व्यवहार भारतात होत आहे. जगातील सात देशांनी युपीआयला मान्यता दिली आहेत. डिजिटल क्रांतीमध्ये डिजी लॉकरचाही मोठा वाटा आहे. देशात ५२ कोटी पेक्षा जास्त नागरिक डिजी लॉकरचा उपयोग करीत आहे. देशात दोन लाख १८ हजार गावांमध्ये भारत नेटच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा देण्यात आली आहे. भारत हा स्टार्टअपमध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात १.९२ लाख स्टार्टअप सुरू झाले आहेत. बँकिंग क्षेत्राने आता आपल्या व्यापकतेकडे लक्ष द्यावे. जगातील पहिल्या दहा बँकांमध्ये भारताच्या बँकेचे नाव असावे अशी अपेक्षाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फायनान्शिअल एक्सप्रेसचे संपादक श्यामल मुजुमदार आणि कार्यकारी संपादक ऋतुराज यांनी मुलाखत घेतली. मान्यवरांच्या हस्ते बँकिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्याम श्रीनिवासन यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.