File Photo : Population
नवी दिल्ली : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील लोकसंख्या आणखी कितीने वाढणार याबाबत कमालीची चिंता होती. पण वर्ल्ड बँकेच्या 2023 च्या डेटानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाल्याचे समोर आले आहे. आता हा जन्मदर 1.98 वर येऊन पोहोचला आहे. हा दर रिप्लेसमेंट लेव्हल 2.1 पेक्षा कमी आहे.
सध्याच्या परिस्थितीत अनेक भारतीय कुटुंबं एकच अपत्य ठेवत आहेत, तर काही दाम्पत्य अपत्य नको ही भूमिका घेत आहेत. ही बदलती मानसिकता आणि जीवनशैलीचा परिणाम म्हणजे भारतात जन्मदर घटत आहे. यामुळे भविष्यात भारताची लोकसंख्या स्थिरावण्याची किंवा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त भारतातच नव्हे तर जपान (1.2), दक्षिण कोरिया (0.72), चीन (1), सिंगापूर (0.97), अमेरिका (1.62), फ्रान्स (1.66) यांसारख्या देशांमध्येही जन्मदर रिप्लेसमेंट लेव्हलपेक्षा खालावला आहे. विशेषतः दक्षिण कोरियात तर सरासरी एक मुलंही जन्माला येत नाही. यामुळे भविष्यात आर्थिक विकास, श्रमबळ आणि वृद्धांची वाढती संख्या हे मोठे प्रश्न ठरू शकतात.
हेदेखील वाचा : Akhilesh yadav viral video : समाजवादी पार्टीसाठी आजचा दिवस ठरला खास; केंद्रात आणि राज्यात गाजवले राजकीय मैदान
दरम्यान, भारतात जन्मदर घटण्यामागची कारणे अनेक आहेत. शहरीकरण, वाढलेला खर्च, जीवनशैलीतील बदल, महिलांचे शिक्षण आणि करिअरप्रती वाढलेली जाणीव, तसेच वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्च. महिलांचा फॅमिली प्लॅनिंगमधील वाढता सहभाग आणि एकच अपत्य असलेली कुटुंबसंख्या यामुळेही हा बदल घडत आहे. एकूणच, भारतासह अनेक प्रगत आणि विकसनशील देशांना आता लोकसंख्येतील या बदलांचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
सरकारी पातळीवर योजना सुरु करणार
लोकसंख्या कमी होणं या समस्येसाठी काही देशांनी सरकारी पातळीवर योजनांची आखणी केली आहे. जपान, रशिया आणि चीनमध्ये अपत्य जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तरीही या उपायांना अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दक्षिण कोरियात तर विशेष मंत्रालयच स्थापन करण्यात आले आहे.