लातूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, अचानक जमीन हादरली; नागरिकांची रात्री पळापळ
लातूर : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. थैमान घालणाऱ्या पावसामुळं मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं असून, बळीराजाला भविष्य अंधकारमय दिसू लागलं आहे. लातूरला याचा सर्वाधिक फटका बसला असून पावसामुळं इथं आलेल्या पूरस्थितीनं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. त्यातच आता या लातूरला आणखी एका संकटाचा सामना करावा लागला तो म्हणजे भूकंपाचा. लातूर जिल्ह्यात पुन्हा भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे. कलबुर्गी, सोलापूर, नांदेड, आणि लातूर या ठिकाणच्या भुकंप मापक यंत्रावर तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर २.४ रिश्टर स्केल या सौम्य भुकंपाची नोंद आढळून आली.
दरम्यान या घटनेच्या एक दिवसाआधीच लातुरमधील मुरुड अकोला गावातही २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के बसले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी भुकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र देन्ही भुकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘किल्लारी’च्या भुकंपाची आठवण
30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यात भूकंप झाला होता आणि त्यामध्ये सुमारे हजारो आपलं आयुष्य गमावलं आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात 30 सप्टेंबर 1993 मोठा भूकंप झाला. या भूकंपाचं केंद्र होतं, सोलापूरच्या ईशान्येला 70 किमी अंतरावरचं किल्लारी गाव. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी अचानक हादरे जाणवले. 6. 4 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता. तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला होता. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं अन् सारं सारं गमावलं. या भुकंपामुळे लातूरवासीयांसह अवघा महाराष्ट्र दु:खात होता. महाराष्ट्र दु:खात असताना देशातून परदेशातूनही मदत आली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आता या भूकंपाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाची उल्लेख आला की, अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं.