
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा त्यांच्यासोबत आहेत. आज शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहांनी भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने आसामला अनेक वर्षांपर्यंत दहशतवाद, विघटन, आंदोलन व उपोषणाची भूमी बनवले, असे ते म्हणाले.
शहा म्हणाले की, येथे विकास, शिक्षण व शांतता यापैकी काहीच नव्हते. पण आज २०१४ नंतर संपूर्ण ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला आहे. हे सुखद चित्र आहे.
शहा म्हणाले, मी गृहमंत्री म्हणून नव्हे तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आसामला आलो आहे. मी येथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हा हितेश्वर सैकिया (आसामचे माजी मुख्यमंत्री) यांनी खूप मारले होते. आम्ही नारे देत होतो, ‘आसाम की गलियां सूनी है इंदिरा गांधी खूनी हैं.’ त्यावेळी आम्हाला भाजप येथे स्वबळावर सरकार स्थापन करेल याचा अंदाजा नव्हता.