एक-दोन नव्हे तर तब्बल 48 आमदार अडकले हनीट्रॅपमध्ये
बंगळुरू : कर्नाटकात हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तर 48 नेतेमंडळी अडकल्याची माहिती दिली जात आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील दोन मंत्री आणि कर्नाटकातील बड्या मंत्र्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जे नेतेमंडळी अडकले आहेत, त्यांना राजकारणातून संपवण्याच्या हेतूने हॅनीट्रॅपचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे.
कर्नाटकच्या राजकारणात हॅनीट्रॅप हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी हॅनीट्रॅप प्रकरणात काही राजकीय नेते अडकल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना आपल्या पदापासून दूरही राहावे लागले होते. आता कर्नाटकात विधानसौधच्या कार्यालयांमध्ये काही मंत्र्यांना, आमदारांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 20 वर्षांत केवळ त्यांनाच नाही तर 48 आमदारांना अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी विधानसभेत बोलताना मंत्री राजन्ना यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘तुमकुरु येथील एक मंत्री हनीट्रॅपला बळी पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, ‘पोलिसांकडे गुन्हा दाखल केला जाईल आणि त्याची सखोल चौकशी केली जाईल. हे काही नवीन प्रकरण नाही. मात्र, कर्नाटकात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. काँग्रेस, भाजप आणि जेडीएससह प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते याध्ये अडकल्याची चर्चा आहे.
हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?
हनीट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो. यामध्ये सुंदर महिलांचा समावेश होतो. शत्रू देशाची गुप्त माहिती बाहेर काढण्यासाठी संबधित देशाच्या मोठ्या पदावरील व्यक्तीला यात टार्गेट केले जाते. या शिवाय मोठ्या व्यक्तीच्या जवळच्या माणसाला ही या ट्रॅपमध्ये अडकवले जाऊ शकते. काही चालकही यात फसले असल्याची उदाहरणे आहे. या प्रकारात एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात. त्यातून संबंधित व्यक्तीकडून गोपनीय माहिती काढून घेतली जाते. असा प्रकार या हनीट्रॅपमधून केला जातो.