Congress Criticized on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून केलेल्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला. पण त्यांच्या आरएसएसच्या उल्लेखामुळे आता राजकीय वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधानांच्या भाषणावर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्रान मसूद यांनी निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या आरएसएसने आपल्या संघटनेच्या कार्यालयावर ५२ वर्षे तिरंगा फडकावला नाही, स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी कोणतेही योगदान दिले नाही. त्यांनी ‘भारत छोडो’ चळवळीला विरोध केला. अशी टिका इम्रान मसूद यांनी केली आहे.
तसेच, आरएसएसने लोकांना आझाद हिंद फौजेविरूद्ध लढण्यासाठी ब्रिटिश सैन्यात सामील होण्याचे आवाहन केलेत. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत कधीही सहभाग घेतला नाही, त्यांनी आधी त्या ५२ वर्षांचा हिशोब द्यावा. त्यांनी कधीही तिरंग्यावर विश्वास ठेवला नाही, संविधानावर विश्वास ठेवला नाही. म्हणून सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती.’असा टोलाही मसूद यांनी लगावला.
पंतप्रधान पदावर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या दयेवर आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या “आशीर्वादावर” अवलंबून आहेत.म्हणूनच त्यांनी लाल किल्ल्यावरून आरएसएसचे कौतुक करून संघटनेला खूश करण्याचा प्रयत्न केला, अशी जहरी टीकाही मसूद यांनी केली. तर, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही मोदीं यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला. “पंतप्रधान आज खूप थकले आहेत आणि ते लवकरच निवृत्त होणार आहेत. पण वैयक्तिक आणि संघटनात्मक फायद्यांसाठी स्वातंत्र्य दिनाचे हे राजकारण करणे हे देशाच्या लोकशाही मूल्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे.
जयराम रमेश म्हणाले, “आज पंतप्रधानांच्या भाषणातील सर्वात त्रासदायक बाब म्हणजे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेणे, जे संवैधानिक, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाच्या भावनांचे उल्लंघन आहे. पण पुढच्या महिन्यात नरेंद्र मोदी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूश करण्याचा एक हताश प्रयत्न आहे. ‘४ जून २०२४ च्या घटनांनंतर पंतप्रधान आणखीनच कमकुवत झाले आहेत. ते आता पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दयेवर आहेत आणि सप्टेंबरनंतर त्यांचा कार्यकाळ वाढवून मिळावा, यासाठी मोहन भागवत यांच्या आशीर्वादावर अवलंबून आहेत. वैयक्तिक आणि संघटनात्मक फायद्यांसाठी स्वातंत्र्य दिनाचे हे राजकारण करणे आपल्या लोकशाही मूल्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे.’ असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
Asia Cup 2025 : मागील T20 मालिकेत खेळूनही या प्लेयर्सचा आशिया कपच्या संघातून होणार पत्ता कट!
लाल किल्ल्यावरून आरएसएस’चे कौतुक करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आज, मी अभिमानाने सांगू इच्छितो की १०० वर्षांपूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नावाच्या संघटनेचा जन्म झाला. राष्ट्रसेवेची १०० वर्षांची कामगिरी हा एक गौरवशाली, सुवर्ण अध्याय आहे. ‘व्यक्तिगत विकासाद्वारे राष्ट्रनिर्माण’ या संकल्पाने, भारतमातेच्या कल्याणाच्या उद्दिष्टाने, स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. एका प्रकारे, आरएसएस ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. तिचा १०० वर्षांच्या समर्पणाचा इतिहास आहे.’