संशयावरून बँक खाते आता होणार नाही फ्रीज; RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली : सायबर फसवणूक आणि संशयास्पद व्यवहारांशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एका नवीन आराखड्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्याअंतर्गत बँकेत संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँक संपूर्ण बँक खाते फ्रीज करू शकणार नाही. बँकेला केवळ ज्या व्यवहारावर वाद किंवा सायबर फसवणुकीचा संशय आहे, तितक्याच रकमेवर तात्पुरती बंदी घालावी लागेल.
प्रस्तावित नियमांनुसार, जर १,००० रुपये किंवा त्याहून अधिकचा असामान्य व्यवहार एखाद्या खात्याला ‘म्युल अकाउंट’ किंवा सायबर फसवणुकीशी जोडलेला दाखवत असेल, तर बँका फक्त संबंधित रक्कमेवरच तात्पुरती रोक लगावू शकतील. उर्वरित खात्याचे व्यवहार पूर्ववत सुरू राहतील. रिझर्व्ह बँकेने हे प्रस्तावित नियम सार्वजनिक अभिप्रायासाठी जारी केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे १ एप्रिल २०२७ पासून लागू करण्याचे प्रस्तावित आहे.
दरम्यान, नवीन प्रणालीत बँक ग्राहकाला संशयास्पद व्यवहाराची कायदेशीर वैधता सिद्ध करण्यासाठी २० कॅलेंडर दिवसांचा वेळ देईल. ग्राहक आपली ओळख, व्यवहाराचा उद्देश आणि पैशांच्या स्रोताशी संबंधित कागदपत्रे सादर करून रक्कमेची वैधता स्पष्ट करू शकेल. यानंतर बँकेला ग्राहकाचे स्पष्टीकरण आणि दिलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी १० कॅलेंडर दिवसांचा कालावधी मिळेल.
AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर
…अन्यथा पोलिस ठाण्यात जाणार प्रकरण
ग्राहकाने 20 दिवसांच्या आत उत्तर दिले नाही किंवा त्याच्या स्पष्टीकरणाने सायबर फसवणुकीचा संशय दूर झाला नाही, तर बँक हे प्रकरण संबंधित पोलिसांकडे वर्ग करेल. अशा स्थितीत बँक ती रक्कम स्वतःच्या स्तरावर अनिश्चित काळासाठी फ्रीज करून ठेवू शकणार नाही. प्रकरण पोलिसांकडे पाठवल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी कायदा अंमलबजावणी यंत्रणेची असेल.
संपूर्ण खाते फ्रीज करण्याऐवजी…
पोलिसांना हे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अधिकृत वैधानिक बंदीचे आदेश जारी करावे लागतील. आरबीआयचा प्रस्तावित आराखडा संशयास्पद म्यूल अकाउंटच्या प्रकरणांमध्ये संपूर्ण खाते फ्रीज करण्याऐवजी केवळ संशयास्पद किंवा वादग्रस्त रक्कमेवरच लक्ष्यित कारवाईचा मार्ग अवलंबणार आहे.
AI च्या साह्याने पकडले जाणार संशयास्पद व्यवहार
नवीन फ्रेमवर्कनुसार बँकांना ‘एआय’ आधारित व्यवहार देखरेख प्रणालीचा वापर करावा लागेल. या प्रणालीद्वारे अशा व्यवहारांची ओळख पटवली जाईल, जे ग्राहकाच्या सामान्य प्रोफाइलच्या तुलनेत अचानक किंवा असामान्य आहेत. याशिवाय, ग्राहकाच्या घोषित उत्पन्नाच्या किंवा प्रोफाइलच्या तुलनेत खूप मोठे असलेले किंवा आधीपासून ओळखल्या गेलेल्या सायबर फ्रॉड नेटवर्कशी जोडलेले व्यवहार यांवरही बारीक लक्ष ठेवले जाईल.






