संग्रहित फोटो
प्राथमिक माहितीनुसार पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील प्रशांत संदीप वाबळे, हर्षल सुनील जाधव आणि मयुर अनिल मदगे हे दुचाकीवरून शिरूरच्या दिशेने जात होते. घोड नदीवरील १७ कमानी पुलाजवळ त्यांच्या वाहनातील पेट्रोल संपल्याने त्यांनी गाडी थांबवली. यावेळी त्यांच्यापैकी एक जण पेट्रोल आणण्यासाठी गेला असता, कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. किशोर शिंदे, प्रशांत झरेकर आणि राहुल गव्हाणे (पूर्ण नाव उपलब्ध नाही, सर्व रा. म्हसे खुर्द, ता. पारनेर) फिर्यादींच्या म्हणण्यानुसार यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी दोन ते तीन राऊंड झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर संबंधित व्यक्तींनी वाहनातून पळ काढल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर बेलवंडी पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरपर्यंता सुरू होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून यापूर्वी परस्परविरोधी गुन्हे दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. गोळीबारानंतर शिरूर (जि. पुणे), बेलवंडी, पारनेर आणि सुपे (ता. पारनेर) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगरहून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सोमनाथ दिवटे, पारनेर पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार कौठावळे, बेलवंडीचे पोलिस भाऊसाहेब यमगर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार आदींनी भेट दिली. आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
यापूर्वीही हल्ल्याचे गुन्हे दाखल
फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यात पूर्वीपासूनच वाद असल्याचे समोर येत आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या वादातून यापूर्वीही यवत आणि पारनेर पोलिस ठाणे हद्दीत जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.
सीमेवरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमागील नेमके कारण, गोळीबारात वापरलेले शस्त्र, आरोपींची संख्या आणि पूर्वीच्या वादाशी नेमका संबंध याबाबत पोलिसांच्या तपासानंतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शिरूर, श्रीगोंदे, पारनेर सीमेवरील संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रात्री उशीरापर्यंत प्रक्रिया सुरू
घटनेमुळे गव्हाणवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






