Terrorist Attack
जम्मू-कश्मीर: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, राजौरीतील दुर्गम गावात असलेल्या लष्कराच्या तळाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. पण भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देत हल्ला हाणून पाडला. या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तेथे किती दहशतवादी होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गंभीर जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी लष्कराने नवीन कॅम्प स्थापन केला होता. गोळीबाराची घटना शौर्य चक्र आणि व्हीडीसी सदस्य पुरषोत्तम कुमार यांच्या घराजवळ घडली. भारतीय लष्कराचे रोमियो फोर्स, जेकेपी आणि सीआरपीएफच्या तुकड्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
पहाटे 3.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील दुर्गम बुधल भागातील गुंडा गावात असलेल्या आर्मी कॅम्पवर जोरदार गोळीबार सुरू केला. ही छावणी नुकतीच बांधण्यात आली होती. पण दहशतवादी हल्ला होताच्य सतर्क लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर देत संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला हाणून पाडला. यादरम्यान एक छोटीशी चकमक झाली. मात्र, दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
गेल्या एका महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात दहशतवाद्यांनी अनेक मोठ्या घटना घडवून आणल्या, ज्यामध्ये 12 जवान शहीद झाले आणि 9नागरिकांचा मृत्यू झाला. ताजा हल्ला डोडा येथे झाला, डोडा येथील घनदाट जंगलात लष्कराच्या शोध पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले.
रेझिस्टन्स फ्रंट, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट, काश्मीर फ्रीडम फायटर्स या नावांनंतर आता काश्मीर टायगर्स या नव्या दहशतवादी संघटनेने सुरक्षा दलांवरील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांच्या तपासावर प्रभाव टाकण्यासाठी जैश आणि लष्कर सारख्या दहशतवादी संघटना या रणनीतीचा वापर करत आहेत. ही पहिलीच वेळ नसली तरी याआधीही दहशतवादी संघटनांनी असे डावपेच अवलंबले आहेत.