लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश
नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्लीत नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला चांगले यश मिळाले असून, 48 जागांवर विजय झाला. त्यानुसार, बहुमताचा आकडाही पार केला आहे. दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले. तर मागील दोन विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 60 पेक्षा अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा त्यांचा केवळ 22 जागांवर विजय झाला आहे. या दोन राज्यांत मिळालेल्या यशानंतर आता भाजपचं ‘मिशन बिहार’ सुरु आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचे लक्ष असणार आहे ते म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीकडे. दिल्लीतील विजयानंतर भाजपचा उत्साह कमालीचा शिगेला पोहचला आहे आणि याचा थेट परिणाम बिहार निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी भाषणात बिहारचा उल्लेख करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विकासकामांचा उल्लेख केला. तेव्हाच दिल्ली काबीज केल्यानंतर आता भाजप व रालोआचे आगामी लक्ष बिहार विधानसभा निवडणूक असल्याचे दिसून आले.
इंडिया-रालोआ थेट लढत?
बिहार विधानसभा निवडणूक एकीकडे भाजपच्या नेतृत्वात रालोआ असेल, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलच्या नेतृत्वात इंडिया आघाडी असेल, रालोआमध्ये भाजपासोबत जदयू, लोजपा (रामविलास), हिन्दुस्तानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचा समावेश आहे. तर इंडिया आघाडीमध्ये राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि विकासशील इन्सान पार्टीचा समावेश असेल.
नितीशकुमार-तेजस्वी असे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे
बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. एनडीएने २४३ विधानसभा सदस्य असणाऱ्या २२५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे. परंतु बिहारची निवडणूक इतर कोणत्याही राज्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. रालोआतून मुख्य चेहरा म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडी चेहरा म्हणून तेजस्वी यादव असेल.
नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचा प्रभाव
गेल्या तीन दशकांपासून बिहारच्या राजकारणावर नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव या दोन नेत्यांनी प्रभाव प्रस्थापित केला आहे. जरी लालू यादव यापुढे राजकीयदृष्ट्या सक्रिय नसले तरी बिहारमधील त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. त्यांचा मुलगा तेजस्वी यादव आता लालू यादव यांच्या राजकीय वारसाला पुढे आणत आहे. नितीश कुमार हे दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. २०१५ मध्ये त्यांनी काही महिने हे पद सोडले आणि जितन राम मांझी यांना मुख्यमंत्री बनविले. या काळात नितीश कुमार यांनी युती बदलली, परंतु मुख्यमंत्र्यांची खुर्ची त्यांच्या सोबत कायम राहिली.