
‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
चेंबूरमधील सुमारे ६६ हजार चौरस मीटर सरकारी जमिनीवरील झोपु योजनेशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नौला गोखले यांच्या खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली. सरकारी जमिनीवरील प्रकल्प खासगी विकासकांमधील व्यावसायिक वादामुळे वर्षानुवर्षे रखडणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
झोपडीधारकांना मालकी हक्कासमान अधिकार नाही
झोपडीधारकांना पुनर्वसनाचा अधिकार असला तरी सरकारी जमिनीवर मालकी हक्कासमान अधिकार मिळत नाहीत. विकासक बदलण्यासाठी केवळ मतभेद पुरेसे नसून गंभीर कायदेशीर अनियमितता आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी ऑगस्ट २००६ पासून प्रयत्न सुरू असून २० वर्षानंतरही पुनर्विकासाची एकही वीट रचली गेलेली नाही. सततच्या न्यायालयीन वादांमुळे झोपु योजनेचा मूळ उद्देशच निष्फळ ठरत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
काय आहे प्रकरण?
या प्रकल्पासाठी २००६ मध्ये आदिशक्ती डेव्हलपर्सची विकासक म्हणून नियुक्ती झाली होती. २००८ मध्ये २,६०३ संरचनांचे परिशिष्ट-२ प्रमाणित करण्यात आले. त्यापैकी १,५६४ संरचना पात्र ठरल्या. विविध वादांनंतर २०२१ मध्ये रुपारेल बिल्डकॉनची नवीन विकासक म्हणून नियुक्ती झाली. त्यांना आशयपत्र आणि बांधकाम परवानगीही मिळाली. विकासकाने मोठी आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर काही झोपडीधारक आणि संस्थांनी ५१ टक्के संमती नसल्याचा दावा करत नियुक्तीला आव्हान दिले. मात्र, विकासकाने केलेली गुंतवणुक आणि प्रकल्प पुढे नेण्यासाठी उचललेली पावले दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे सांगत न्यायालयाने रुपारेलला तातडीने हटविण्यास नकार दिला.