भारतातील 'या' राज्यात पावसाचा हाहा:कार; ढगफुटी होऊन जनजीवन विस्कळीत, अनेक घरंच गेली वाहून
मंडी : देशातील काही राज्यांत पावसाची जोरदार बॅटिंग पाहिला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणात दिसून येत आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची चिन्हेदेखील पाहिला मिळत नाहीत. मात्र, हिमाचल प्रदेशात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मंडीच्या धरमपूर, लॉंगनी येथे ढगफुटी झाल्याची माहिती दिली जात आहे. या ढगफुटीमुळे कारसोग खोऱ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामध्ये 7 ते 8 घरांसह अनेक भागातील वाहनेही वाहून गेली आहेत.
कुल्लूच्या बंजर खोऱ्यात तीर्थन नदीचे भयंकर रूप दिसून येत आहे. जिथे पूर-पावसामुळे डझनभर रस्ते तुटले आहेत. कारसोगच्या मेगलीमध्ये, नाल्याचे पाणी गावातून वाहू लागले, ज्यामुळे सुमारे 8 घरे आणि दोन डझन वाहने त्याच्या विळख्यात आली. पांडोहमध्ये, नाला भयंकर स्वरूपात वाहत होता. त्यानंतर मध्यरात्री अनेक घरांचे लोक मुख्य रस्त्यावर पोहोचले. पांडोहमधील पोलिस छावणीने लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात झालेल्या या मुसळधार पावसामुळे सुमारे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मंडीच्या कारसोग आणि धरमपूरमध्ये ढगफुटीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आणि 16 जण बेपत्ता आहेत. रस्ते, पूल वाहून गेले आहेत आणि हा विनाशकारी पाऊस अद्याप थांबलेला नाही. या घटनेत घरांचे नुकसान झाले. 12 गोठे आणि 30 गुरे वाहून गेली. मंडी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. गोहर परिसरात ४ ठिकाणी ढगफुटी झाली, ज्यामध्ये २ घरे उद्धवस्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरीला तर…
आज कसे असेल हिमाचलमध्ये हवामान?
हिमाचल प्रदेशात मान्सूनचे भयंकर रूप दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर डोंगरांना भेगा पडल्याने आणि रस्त्यांवर ढिगारा पडल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १ जुलै ते ६ जुलै दरम्यान हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आजही मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
हेदेखील वाचा : Monsoon Alert: सावधान! रेड अलर्टमुळे पाऊस आज ‘या’ राज्यात…; मान्सूनच्या आगमनाने दिल्लीकर सुखावले