मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे येथील जंगलात एक मोठी शोध मोहीम राबवत आहेत. पहलगाम हल्ल्यातील ३ गुन्हेगारांचे रेखाचित्र तपास यंत्रणांनी जारी केले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचा एक फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये ते शस्त्रांसह दिसत आहेत. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळणार आहे.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या हल्ल्याचा तपास करत आहे. त्यांची एक टीम श्रीनगरलाही पोहोचली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे दहशतवादी अनेक परदेशी पर्यटकांनाही मारू इच्छित होते. असा दावा केला जात आहे की दहशतवादी मुझफ्फराबाद आणि कराचीशी सतत संपर्कात होते.
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोद, अमित शाह तेथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता गिरीश महाजनही श्रीनगरला रवाना झाले आहेत. तसेच तिथे अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तपास यंत्रणांनी ३ दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत; यातील दोन हल्लेखोर स्थानिक दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. हे दहशतवादी लष्कराच्या गणवेशात पहलगाममध्ये पोहोचले होते, असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे तपास यंत्रणांनी हे रेखाचित्र तयार केले आहे. या दहशतवाद्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी आहेत.
दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा केला. श्रीनगरनंतर अमित शाह यांनी पहलगामला जाऊन घटनास्थळाला भेट दिली. मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर, गृहमंत्री शाह यांनी सोशल मीडिया एक्स वर पोस्ट केले आणि म्हटले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना मी जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहतो. भारत दहशतवादासमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.”
मंगळवारी दुपारी २.३० वाजता दक्षिण काश्मीरमधील पहलगामजवळील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळावर सुमारे ६ दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केल्याने २८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक पर्यटक होते.
जम्मू आणि काश्मीर सरकारने पहलगाम हल्ल्यासाठी भरपाई जाहीर केली आहे. आज बुधवारी झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला सरकारने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, प्रियजनांच्या नुकसानाची भरपाई कोणत्याही पैशाने होऊ शकत नाही, परंतु जम्मू आणि काश्मीर सरकार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करते. मुख्यमंत्री ओमर यांनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.