Congress vs Bjp: काँग्रेसने मणिपूरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मणिपूरकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच संविधानाला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र, आपल्याच देशातील मणिपूर जे हिंसेच्या संकटाशी लढत आहे, त्या ठिकाणी एकदाही गेले नाहीत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. भाजप आणि आरएसएसचा हेतू भारताचे संविधान बदलण्याचा आहे. ज्यामुळे भारताच्या नागरिकांचे अधिकार काढून घेता येईल. लोकशाही आपला पाया असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.
खर्गे यांचा मोदींवर निशाणा
मल्लिकार्जुन खर्गे मोदींवर निशाणा साधत म्हणाले, “तुम्ही संविधानाच्या मदतीनेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनला आहेत. तुम्ही संसदेत प्रवेश करण्याच्या अगोदर संविधानाला नमन केले होते. मात्र आज तुम्ही त्याच संविधानाला संपवण्याच्या प्रयत्न करत आहात. देशातील जनता तुमचा हेतू कधीही सफल होऊन देणार नाहीत.” भाजपच्या आरोपाला उत्तर देताना खर्गे यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार मजबूत स्थितीत असल्याचे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी रिटायर्ड होणार; खुद्द मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच दिलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “७५ वर्षांचे वय झाल्यानंतर कार्य थांबवावे आणि इतरांना संधी द्यावी,” असे भागवतांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे निवृत्तीची आठवण करून दिली जात असल्याचा सूर उमटू लागला आहे. त्यांच्या या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे निवृत्तीची आठवण करून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्या नजरा आता पंतप्रधानांवर खिळल्या आहेत.
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “ही टिप्पणी कोणासाठी होती, हे मी सांगणार नाही. पण सप्टेंबरमध्ये कोण ७५ वर्षांचे होत आहे हे सर्वांना माहिती आहे. २०१४ मध्ये ७५ वर्षांनंतर मार्गदर्शक मंडळात समावेश करण्याची घोषणा झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना त्यावेळी बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे भागवत कदाचित मोदींना त्या गोष्टींची आठवण करून देत असावेत.” तसेच “हा दोन्ही कुटुंबांमधील प्रश्न आहे – संघ आणि भाजप. आपण यात मध्यस्थी करू नये. मार्गदर्शक मंडळ परत सुरू करायचा की नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा.” असंही त्यांनी म्हटलं आहे.