नरेंद्र मोदी रिटायर्ड होणार; खुद्द मोहन भागवतांच्या 'त्या' विधानाने चर्चांना उधाण
Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच दिलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “७५ वर्षांचे वय झाल्यानंतर कार्य थांबवावे आणि इतरांना संधी द्यावी,” असे भागवतांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे निवृत्तीची आठवण करून दिली जात असल्याचा सूर उमटू लागला आहे. त्यांच्या या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे निवृत्तीची आठवण करून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्या नजरा आता पंतप्रधानांवर खिळल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “भागवत यांच्या ‘७५ वर्षे झाल्यावर संन्यास’ या विधानावरून संघ आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद स्पष्टपणे समोर येतात.” त्यांनी यावरून संघ-भाजप संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाकडे लक्ष वेधले.
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “ही टिप्पणी कोणासाठी होती, हे मी सांगणार नाही. पण सप्टेंबरमध्ये कोण ७५ वर्षांचे होत आहे हे सर्वांना माहिती आहे. २०१४ मध्ये ७५ वर्षांनंतर मार्गदर्शक मंडळात समावेश करण्याची घोषणा झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना त्यावेळी बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे भागवत कदाचित मोदींना त्या गोष्टींची आठवण करून देत असावेत.” तसेच “हा दोन्ही कुटुंबांमधील प्रश्न आहे – संघ आणि भाजप. आपण यात मध्यस्थी करू नये. मार्गदर्शक मंडळ परत सुरू करायचा की नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही ट्विटर एक्सवर पोस्ट शेअर करत टोला लगावला. “बिचारे पुरस्कार मागणारे पंतप्रधान! सरसंघचालकांनी त्यांना आठवण करून दिली की १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होतील. पण पंतप्रधानही सांगू शकतात की सरसंघचालक स्वतः ११ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील! एक बाण, दोन निशाणे!” असे लिहीत जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत या दोघांनाही लक्ष केले.
आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेण्याचा संकेत दिला आहे. योगायोगाने, भागवत यांचाही यंदा ७५ वा वाढदिवस आहे. ९ जुलै रोजी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात, संघ विचारवंत दिवंगत मोरोपंत पिंगळे यांना समर्पित ‘मोरोपंत पिंगळे: द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी भागवत म्हणाले, “जेव्हा तुम्ही ७५ वर्षांचे व्हाल, तेव्हा थांबावे आणि इतरांना मार्ग द्यावा.”
या प्रसंगी त्यांनी मोरोपंत पिंगळे यांचा दाखला देत सांगितले की, “पिंगळे एकदा म्हणाले होते, जर तुम्हाला ७५ व्या वर्षी शाल घालून सन्मानित केले जात असेल, तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे: तुम्ही आता बाजूला व्हा, तुमचं काम संपलं आहे. आता नव्या पिढीला संधी द्या.” मोहन भागवत यांच्या या विधानानंतरसंघाच्या अंतर्गत कार्यपद्धतीसोबतच, सध्याच्या नेतृत्वाला दिला गेलेला सूचक सल्ला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.