Narendra Modi- Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आणि अन्य नेते उपस्थित आहेत. 98 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
अखिल भारतीय साहित्य दीपप्रज्वलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडून दीपप्रज्वलन उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना स्वतःच्या हातांनी खुर्चीत बसवले. इतकेच नव्हे तर मोदी यांनी शरद पवार यांच्यासाठी स्वतःच पाण्याचा ग्लास भरला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हि आहे पवार साहेबांची दिल्लीत असलेली ताकद…
मान सन्मान असाच मिळत नाही कित्येक दशके लोकांसाठी झिजून मिळवावा लागते..!#पवारसाहेब ❤️ pic.twitter.com/PVa0kYJh3J
— Akash Pandhare (@AkashPandhare03) February 21, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या कृतीमुळे तेथील उपस्थित मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवून मोदींचे कौतुक केले. तसेच सोशल मिडियावर देखील मोदींच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे .
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडाची असं त्यांनी म्हटलं. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी केली.
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३०० वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे १०० वर्ष साजरी करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.