नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे 3 समन्स जारी केले आहेत.
तीन समन्स पाठवण्यात आल्यानंतरही केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाही. ईडीचे समन्स हे बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रपरिषदेत केला. अबकारी धोरणप्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल, यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून 3 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले होते; परंतु केजरीवाल यांनी ईडीला एक खरमरीत पत्र पाठवून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रमात व्यस्त असल्याने आपण चौकशीसाठी ईडी कार्यालयात येऊ शकत नाही.
तसेच जर ईडीला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लिखित स्वरूपात विचारावे, त्या सर्व प्रश्नाला उत्तर दिले जाईल, असे उत्तर त्यांनी दिले होते.
लोकसभा निवडणुकीत प्रचारापासून रोखण्याचा डाव
लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स का धाडण्यात येत आहेत. तपास सुरू होऊन 2 वर्षे झाली आहेत. मग आताच हे समन्स का पाठवले जात आहेत असे केजरीवाल यांनी विचारले. सीबीआयने आपल्याला 8 महिन्यांपूर्वी बोलावले होते, तेव्हा मी गेलो होतो आणि सगळ्या प्रश्नांचीही मी उत्तरे दिली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी मला बोलावून चौकशी करणे हा ईडीचा उद्देश नसून मला अटक करणे हा उद्देश असल्याचे केजरीवाल म्हणाले.