सुरत : एकीकडे भारत चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चंद्र मोहिमेच्या यशाच्या जल्लोषात मग्न आहे. तर दुसरीकडे गुजरात पोलिस या मोहिमेशी संबंधित वैज्ञानिक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील रहिवासी मितुल त्रिवेदी (Mitul Trivedi) यांनी दावा केला आहे की, ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम करतात आणि त्यांनी चांद्रयान- 3 चंद्र मोहिमेचे लँडर डिझाइन केले आहे. याबाबतचा कोणताही पुरावा अद्याप ती व्यक्ती सादर करू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगचे श्रेय घेत मितुलने दावा केला की, तो चांद्रयान-2 प्रकल्पाचा भाग होता आणि नवीन चांद्रयान मोहिमेवर काम करण्यासाठी इस्रोने त्याला आमंत्रित केले होते. त्याने लँडरच्या डिझाइनमध्ये बरेच बदल केले आहेत, ज्यामुळे ते चंद्रावर यशस्वीरित्या उतरू शकले. पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मितुलचे हे सर्व दावे खोटे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कथित शास्त्रज्ञाचे दावे खोटे
कथित शास्त्रज्ञाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत काही स्थानिक वृत्तपत्रांनीही त्यावर काही वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, नंतर तपास केला असता दावे खोटे निघाले. पोलिस तपासात मितुल हा बी. कॉम पदवीधारक असल्याचे निष्पन्न झाले. त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो फ्रीलान्सर आहे आणि त्याने नासामध्येही काम केले आहे. पण, तपासानुसार मितुल हा प्रत्यक्षात शास्त्रज्ञ नाही. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखा करणार आहे. खोटेपणा सिद्ध झाल्यास त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवला जाईल.