शेतकरी पुन्हा आक्रमक; शंभू स्थानकावर रेल्वे रोखली, बॅरिकेड्स तोडून आंदोलक रूळावर

मध्यंतरी शांत झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. पंजाब-हरयाणाच्या शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखली. शेतकऱ्यांनी शंभू हद्दीजवळील रेल्वे रुळावर ठिय्या दिला होता.

    अंबाला : शेतकऱ्यांचे आंदोलन मध्यंतरी शांत झाले होते. मात्र, आता हे आंदोलन पुन्हा पेटले आहे. पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांनी शंभू स्थानकावर रेल्वे वाहतूक रोखली. शेतकऱ्यांनी शंभू हद्दीजवळील रेल्वे रुळावर ठिय्या दिला होता. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. परंतु, शेतकरी बॅरिकेड तोडून रुळावर बसले.

    युवा नेते नवदीपसिंग जलबेडा यांच्यासह 3 शेतकऱ्यांची सरकारने सुटका करावी, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांची हरियाणा-पंजाब सरकारसोबत बैठक झाली होती. सरकारने त्यांच्या सुटकेचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलनास भाग पाडले.

    पंधेर आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते सर्वनसिंह पंधेर म्हणाले, आम्हाला ट्रेन रोखायची नव्हती. मात्र, हे करावे लागले. हे सरकारचे अपयश आहे. आंदोलन बेमुदत चालणार आहे. सरकारला 16 एप्रिलची मुदत दिली होती. मात्र, सरकारने त्यांना सोडले नाही. आंदोलनाचा 34 गाड्यांना फटका बसला. 11 गाड्या पूर्णपणे रद्द कराव्या लागल्या.