प्रयागराज : कुख्यात गुंड, माफिया अतिक अहमद (Atique Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) याची कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी ‘ऑन कॅमेऱ्या’समोर बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोघेही जागीच मृत पावले. या घटनेनंतर देशभरात एकच चर्चा सुरु आहे. त्यात आता ट्विटरवरून एक धमकी देणाऱ्या मेसेजवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्याने अतिक अहमदचा मुलगा अली जिवंत आहे. इंशा अल्लाह हिसाब लिया जाएगा, असे म्हटले आहे.
अतिक अहमदच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी देणारे ट्विट केल्याप्रकरणी प्रयागराजच्या सायबर क्राईम ठाण्यात ट्विटर युजरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सायबर क्राईमचे राजीव कुमार तिवारी यांनी सांगितले की, ’27 एप्रिल रोजी विशेष पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी ट्विटरवर ‘द सज्जाद मुघल’ या अकाउंटवरून व्हायरल झालेल्या मेसेजविरुद्ध आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ‘द सज्जाद मुघल’ नावाच्या ट्विटर युजरने लिहिले की, ‘अतिक अहमदचा मुलगा अली जिवंत आहे. इंशा अल्लाह परिस्थिती, वेळ आणि शक्ती बदलेल. मग प्रयागराजलाही अलाहाबाद म्हटले जाईल, सर्व हिशेब चुकता केला जाईल.
अतिक आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची माध्यमांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी दोघांवर बेछूट गोळीबार केला होता. पत्रकार बनून आलेल्या तिघांनी अतिक आणि अशरफ या दोघांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते ठार झाले.