देशभरात पावसाचा जोर वाढला
गुजरात राज्याला महापुराचा धोका
सरदार डॅममधून साडेचार लाख क्युसेकने विसर्ग
Gujarat Floods: देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. दिल्ली, पंजाब राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी दिल्लीत यमुना नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. मात्र दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यमुना नदीची पाणी पातळी २०७.४८ वरून २०७.३१ पर्यंत खाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास यमुनेचे पाणी पातळी झापाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत अनेक ठिकाणी शिरले पाणी
हरियाणाच्या हाथिनीकुंड धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग यमुना नदीत केला जात आहे. त्यामुळे दिल्लीत अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. मयूर विहार आणि काश्मिरी गेट हे परिसर पाण्याखाली गेले आहेत. दिल्लीच्या अनेक भागात यमुनेचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
महापुरामुळे जनजीवन विस्कळीत
दिल्लीच्या यमुना बाजार, मजनू का टीला, मयूर विहार, गीता कॉलनी आणि झरोडा कलान यांसारख्या भागात घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याने या महिन्यातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. खराब हवामान आणि पावसामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. तर काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
गुजरात राज्याला महापुराचा धोका
गुजरातमध्ये नर्मदा नदी दुथडी भरून वाहत आहे. सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किम नदी इशारा पातळीच्यावरून वाहत आहे. ज्यामुळे अनेक गावात पाणी शिरले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे वडोदरामध्ये नर्मदा नदीवर असलेल्या सरदार सरोवर धरणातून साडेचार लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये महापुराचा धोका निर्माण झाला आहे.
बडोदरा जिल्ह्यातील मल्हार घाटाच्या ९० पेक्षा जास्त पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. नर्मदा नदीने अजून इशारा पातळी ओलांडली नसली तरी पावसाचा जोर पाहता लवकरच नदी ती पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरातमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान गुजरात सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.