देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह तब्बल १८ राज्यांना अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरपासून पूर्व भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.
२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओडिशा, झारखंड, गंगेचे पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मराठवाडा कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, केरळ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
ईशान्य भारत, सिक्कीम, बिहार, नैऋत्य मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भ, तामिळनाडू आणि आग्नेय राजस्थानमध्ये एक ते दोन तासांत मुसळधार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. दुसरीकडे मुंबईत २ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस सुरू राहील आणि त्यानंतर तो थांबेल. 2023 च्या मान्सूनचा निरोप घेणारा हा मुंबईसाठी पावसाचा शेवटचा स्पेल असेल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.