राजस्थानसह उत्तर भारतात पूर; उत्तरेतील राज्यांत मुसळधारेचा इशारा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे दिसून येत आहे. त्यातच देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या वाहत आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहानपूर, खेरी, पिलीभीत, बरिच्या, ए. श्रावस्ती, आझमगड, वाराणसी, मिर्झापूर, सोनभद्र, गाझीपूर, सहारनपुर, मेरठ, मुझफ्फरनगर, बिजनौर, बलिया, मऊ, देवरिया, ज्योतिबा फुले नगर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेशातील 20 हून अधिक जिल्ह्यांत पाऊस होताना दिसत आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये रविवारी (दि.३) मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
दरम्यान, राजस्थानमधील बहुतेक जिल्ह्यांना पावसापासून दिलासा मिळेल, असाही अंदाज आहे. हवामान विभागाने अलवर, भरतपूर, करौली, दौसा, धोलपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. या काळात लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विजांच्या कडकडाटाची शक्यता
बिहारमध्ये वीज पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपूर, मुंगेर, बांका, सुपौल आणि मधुबनीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय पाटणा, बेगुसराय, मुंगेर, नालंदा, गया, नवादा, लखीसराय, जमुई, नवाडा, गया, शेखपुरा येथेही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत अलर्ट जारी
हवामान विभागाकडून विदर्भात रविवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला. अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम या भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस होताना दिसत आहे. यामुळे धरणातील विसर्ग हा वाढवण्यात आला.