'तर भाजपचा विजय झालाच नसता'; राहुल गांधींनी सांगितलं नक्की काय ठरला होता प्लान अन् कोणामुळे फिस्कटला
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रायबरेलीच्या दौऱ्यात एक मोठा खुलासा केला. रायबरेलीत एका दलित मुलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींना एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु मायावतींनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. जर तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपला कधीही निवडणूक जिंकला आली नसती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी बसपासोबतच्या युतीबाबत अधिकृतपणे एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसने मायावतींना एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, अशी जाहीर कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती, बसपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
रायबरेलीत राहुल गांधी म्हणाले की, काशीराम आणि मायावती यांनी दलितांसाठी चांगलं काम केले आणि अजूनही करत आहेत. परंतु एक प्रश्न असा आहे की मायावती आजकाल योग्यरित्या निवडणूक का लढवत नाहीत? त्यांनी भाजपविरुद्ध आमच्यासोबत लढावे अशी आमची इच्छा होती. पण काही ना काही कारणास्तव ते राहुन गेलं. जर तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजप कधीही जिंकला नसता, मात्र तसं झालं नाही, यांची आम्हाला खंत वाटते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इडिया आघाडीचा घटक म्हणून, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढल्या आणि दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली. तथापि, निवडणुकीपूर्वी, अनेक वरिष्ठ सपा नेत्यांनी बसपाला युतीमध्ये समाविष्ट न करण्याची बाजू मांडली होती आणि त्याला विरोध केला होता, असं त्यांनी म्हटलं आहे. आता राहुल गांधींनी स्वतः बसपा प्रमुख मायावती यांना दिलेल्या प्रस्तावाचा खुलासा केला आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील नवीन राजकीय समीकरणांबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राहुल गांधींचा असा विश्वास आहे की मायावती प्रभावी निवडणूक रणनीती स्वीकारत नाहीत. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि अलिकडच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या संदर्भात जिथे बसपाची कामगिरी खूपच कमकुवत होती, त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यामुळे भविष्यात काँग्रेस आणि बसपा यांच्यात युती होण्याची शक्यता आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.