शांतताप्रिय राष्ट्र असूनही भारत शांततावादी असू शकत नाही, असा स्पष्ट संदेश संरक्षण दलाचे प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) यांनी पाकिस्तानला (Pakistan) दिला आहे. मध्यप्रदेशातील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित ‘रण संवाद’ या पहिल्या त्रिसेवा चर्चासत्राला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी युद्धनीती आणि संरक्षणात्मक तयारीवर भर दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भात बोलताना जनरल चौहान म्हणाले की, “भारत नेहमीच शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे. आपण शांतताप्रिय राष्ट्र आहोत, पण शांततावादी असण्याची चूक करू शकत नाही. माझा विश्वास आहे की शक्तीशिवाय शांतता केवळ एक कल्पना आहे. ‘जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धासाठी तयार राहा’ असे एक लॅटिन वाक्य आहे आणि तेच आजच्या परिस्थितीला लागू होते.”
“if You Want Peace, Prepare for War.”
“Focus of armed forces need to be on war, warfare and war fighting.”
– CDS General Anil Chauhan pic.twitter.com/zqut1t73sQ
— War & Gore (@Goreunit) August 26, 2025
विकसित भारत बनण्यासाठी केवळ तंत्रज्ञानातच नव्हे, तर विचार आणि वर्तनातही ‘सशक्त’, ‘सुरक्षित’ आणि ‘स्वावलंबी’ असणे आवश्यक आहे, असे जनरल चौहान यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकामध्ये युद्धनीती आणि लष्करी विचारसरणीची जागरूकता वाढवणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
युद्धातील विजयासाठी लष्करी रणनीती आणि शूर योद्ध्यांचे योग्य संयोजन आवश्यक असते, हे सांगताना त्यांनी महाभारत आणि गीतेचा दाखला दिला. “अर्जुन हा महान योद्धा होता, तरी त्याला विजयासाठी कृष्णाची गरज होती. त्याचप्रमाणे, चंद्रगुप्ताला चाणक्याच्या ज्ञानाची आवश्यकता होती,” असे ते म्हणाले. भारत ही गौतम बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांची भूमी असूनही, देशाला आपले सामर्थ्य राखणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी युद्ध तंत्र आणि रणनीतीच्या विश्लेषणासाठी शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. युद्ध कसे लढले जाते, त्याची शैक्षणिक मांडणी आणि प्रत्यक्ष रणनीती यांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.