
मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा
हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतावर सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम हवामानावर होत आहे. याशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड परिसरातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असली, तरी अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.
Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट
९ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डोंगराळ भागांत पावसामुळे भूस्खलन आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊ, कानपूर, गोरखपूर, प्रयागराज, मेरठ आणि आग्रा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील ४२ जिल्ह्यांत पावसाचा इशारा असून काही भागांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी २० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे तापमानात घट होऊन उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
बिहारमधील पाटणा, गया, भागलपूर आणि दरभंगा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, उज्जैन आणि सागर परिसरातही पावसाचा अंदाज आहे. काही भागांत ताशी ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, चंडीगड, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच किनारी आंध्र प्रदेश, यानम, किनारी कर्नाटक, रायलसीमा आणि दक्षिण भारतातील इतर काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. मान्सूनच्या माघारीच्या काळात निर्माण झालेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.