Parliament
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक यावेळी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. एनडीए सरकार आणि विरोधक दोघेही सभापतिपदासाठी उमेदवार उभे करू शकतात. विरोधी इंडिया आघाडीनेही सभापतिपदासाठी आपला उमेदवार उभा केला, तर पहिल्यांदाच सभापतिपदासाठी चुरशीची लढत होईल.
स्वतंत्र भारतात आजपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांची निवड नेहमीच एकमताने होत आली आहे. एम.ए. अयंकर, जी.एस. धिल्लन, बलराम जाखड आणि जी एम.सी. बालयोगी या केवळ चार अध्यक्षांची या पदावर पुन्हा निवड झाली आहे. मात्र, यावेळी इंडिया आघाडीही सभापतीची निवडणूक लढवू शकते.
वास्तविक, विरोधी आघाडी उपसभापतिपदाची मागणी करत आहे. उपसभापतिपद न मिळाल्यास सभापतिपदाची निवडणूकही लढविणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, जर सरकार कोणत्याही विरोधी नेत्याला उपसभापती बनवण्यास सहमत नसेल तर आम्ही सभापतिपदासाठी निवडणूक लढवू.
राजनाथसिंह यांच्याकडे प्रमुख जबाबदारी
केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह हे मोदी सरकारमधील अटल-अडवाणी काळातील भाजपाच्या निवडक चेहऱ्यांपैकी एक आहेत. राजनाथ यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले असून दोनदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.