
'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला, रावणापेक्षाही जास्त सत्ताधाऱ्यांना अहंकार'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका
मुंबई : राज्यातील पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुकीत झालेला गोंधळ पाहता निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचा बाहुला झाला आहे. निवडणूक आयोग कठपुतळी झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केली. आम्ही काहीही करु शकतो, हे दाखविण्यासाठी हा सर्व गोंधळ सुरु आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार आल्याची टीका सपकाळ यांनी केली.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या पुढाकारातून ‘सेवा-त्याग-कर्तव्य’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्यापूर्वी सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठविली. निवडणुकीमध्ये झालेला गोंधळ पाहता निवडणूक आयोग नशापाणी करुन काम करत आहे की काय? असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.
सपकाळ म्हणाले, मतदानाला 40 तास शिल्लक असताना मतदान पुढे ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंधळ, मतांची धांदल दिसून आली. हे निवडणूक आयोगाचे अपयश असून आयोग सत्ताधारी पक्षांच्या हातातील बाहुले झाले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
भारतीय जनता पक्ष पैसा खाऊन गब्बर झाला
राज्यात सत्ताधारी म्हणून काम करताना भारतीय जनता पक्ष पैसा खाऊन गब्बर झाला आहे. सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. ‘पैसा फेक तमाशा देख’ या वृत्तीने भाजप काम करत आहे. निवडणुकीत झालेल्या गोंधळाच्या राज्याच्या विविध भागातून २५ हजारापेक्षा अधिक तक्रारी आल्या असाव्यात. आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला असून, लोकशाहीची पायमल्ली झाल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
सत्ताधार्यांना रावणापेक्षा देखील जास्त अहंकार
सत्ताधार्यांना रावणापेक्षा देखील जास्त अहंकार आलेला आहे. लोकशाही ज्या दिशेने चालली आहे. ते घातक असून आता विजयी झालेले उमेदवार फोडले जातील, अशी भितीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी व्यक्त केली. काँग्रेस राज्यभरात १६० ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी लढत आहे. पक्षाचे नेते राज्यात सर्वत्र फिरले. एकट्यानेच राज्यभरात ६५ सभा घेतल्याचे स्पष्टीकरण सपकाळ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
हेदेखील वाचा : मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार, मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब; सपकाळांची टीका