
JNU Violence 2026 JNU Student Protest
JNU Violence: Violent clash between police and students during the march, 25 policemen injured, 51 detained
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष
कुलगुरू शांतीश्री धुलिपुडी पंडित यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ लाँग मार्च
विद्यार्थ्यांकडून पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्नात असताना संघर्ष
JNU Violence: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस आणि निदर्शकांमध्ये जोरदार झटापट झाली. या घटनेत २५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अत्यंत विचित्र आणि गंभीर आरोप केले आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने गुरुवारी कॅम्पसपासून शिक्षण मंत्रालयापर्यंत ‘लॉंग मार्च’चे आवाहन केले होते. विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलिपुडी पंडित यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये केलेल्या टिप्पण्यांचा निषेधार्ह हे आंदोलन करण्यात आले. कुलगुरूंनी UGC नियमांबद्दल, विद्यार्थी संघटनेच्या अधिकाऱ्यांचे निलंबन आणि प्रस्तावित रोहित कायद्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, JNU प्रशासनाने निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच कळवले होते की कॅम्पसबाहेर कोणताही मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. पण त्याचवेळी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच त्यांचा निषेध नोंदवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. असे असतानाही, दुपारी ३:२० च्या सुमारास, सुमारे ४००-५०० विद्यार्थी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडले आणि त्यांनी आपला मोर्चा मंत्रालयाकडे दिशेने वळवला. पण पोलिसांनी बॅरिकेड्स लावून विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक विद्यार्थ्यांनी सुरक्षा दलांवर लाठ्या, बॅनर आणि बूट फेकले. झटापट इतकी तीव्र होती की, काही विद्यार्थ्यांनी तैनात असलेल्या पोलिसांना चक्क चावा (Bite) घेतल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किमान बळाचा वापर केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी महिला विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले आणि क्रूरपणे लाठीमार केला.
याप्रकरणी पोलिसांनी वसंत कुंज पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ७६/२६ दाखल केला असून मोठी कारवाई केली आहे. जेएनयूएसयू (JNUSU) अध्यक्षा अदिती मिश्रा आणि माजी अध्यक्ष नितीश कुमार यांच्यासह ५१ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (पूर्वीचे आयपीसी) कलम १२१(१), १३२, २२१ आणि ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. पोलिसांनी लोकशाही मार्ग चिरडण्यासाठी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला असून यात अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी अज्ञातस्थळी नेल्याचा दावा करत, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शिक्षकांनी भीती व्यक्त केली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी ‘जेएनयूटीए’ने केली आहे.