तिरुअनंतपूरम : आर्थिक विपन्नावस्थेला (Financial Crisis) कंटाळून एका व्यक्तीने आपल्या घराबाहेर थेट किडनी, लिव्हर फॉर सेल’ असा बोर्डच लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केरळच्या मनाकौडमध्ये एका घराबाहेर असलेला बोर्ड पाहून त्या रस्त्याने जाणारे-येणारेही हेलावून जातायेत. काही जणांना हे प्रँक आहे असं वाटतंय, तर काही जणांना सरकारचा निषेध करण्यासाठी हा बोर्ड लावण्यात आलाय, असंही वाटतंय. त्यातील काही जणांना यात काही काळंबेरं तर नाही ना, असाही संशय आला. त्यातल्या काही जणांनी या बोर्डवर लिहिलेले दोन्ही मोबाईल नंबर लावून पाहिले. तर दोन्ही मोबाईल नंबर हे खरे निघालेत. अधिक चौकशीनंतर लक्षात आले की गरिबीनं अडचणीत असलेल्या एका व्यक्तीनं, जगण्याला कंटालून अखेरीस आपले अवयव विकण्याचा प्रयत्न चालवलाय.
कोण आहे अवयव विकणारी व्यक्ती
बोर्ड लावणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संतोष कुमार. संतोष कुमार हे मानाकौड पुथेन रस्त्यावरच राहतात. संतोष कुमार यांचं वय 50 च्या आसपास आहे. संतोष एका फळविक्रेत्याच्या दुकानात नोकरीला होते. त्या ठिकाणी गोणी उचलण्याचं काम ते करीत. मात्र, त्या कामात एकदा अपघात झाल. त्यानंतर उपचारासाठी त्यांना बराच खर्च करावा लागला. आता ते बरे झाले असले तरी त्यांच्याकडे आता पैसे शिल्लक नाहीयेत. हाताला कामही नाहीये.
जमिनीवरुन भावाशी सुरुये वाद
मानाकौड जंक्शनजवळ असलेला एक जमिनीटा तुकडा विकून गुजराण करावी, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, या जमिनीवरुन त्यांचा त्यांच्या भावाशी वाद सुरु आहे. ही जमीन त्यांच्या आईच्या नावावर होती. आता या जमिनीत संतोषसह सहा भावाबहिणीचे वाटेही असल्याचं सांगण्यात येतंय.
कोरोना काळानंतर समस्या अधिक वाढल्या
संतोष यांची पत्नी कोरोना काळापूर्वी विद्यार्थ्यांचे क्लास घेत होती. कोरोना काळानंतर तेही उत्पन्न बंद झाल्याचं त्यांचं म्हणणंय. आता अशा स्थितीत घर चालवायचं तरी कसं, असा प्रश्न त्यांना पडलाय. त्यामुळेच अखेरीस परिस्थितीला कंटाळून त्यांनी किडणी, लिव्हर विकण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.