Laxman Singh expelled from Congress party for controversial statement on rahul Gandhi
भोपाळ : आपल्याच पक्षातील नेत्यावर टीका करणे कॉंग्रेस नेत्याला महागात पडले आहे. काँग्रेस पक्षाने कडक पाऊल उचलत मध्य प्रदेशचे माजी आमदार लक्ष्मण सिंह यांना पक्षातून थेट काढून टाकले आहे. लक्ष्मण सिंह हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ आहेत. पक्षाच्या शिस्तपालन समितीचे सचिव तारिक अन्वर यांनी या संदर्भात एक पत्र जारी केले आहे. लक्ष्मण सिंह यांनी कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.
लक्ष्मण सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कॉंग्रेसने एक पत्र जारी केले आहे. यामध्ये लक्ष्मण सिंह हे पक्षाविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते आणि त्यामुळे त्यांना तात्काळ पक्षातून काढून टाकण्यात येत आहे. काँग्रेस शिस्तपालन समितीने अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लक्ष्मण सिंह यांना हटवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. लक्ष्मण सिंह यांनी अलिकडेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर जाहीर टीका केली होती आणि वादग्रस्त विधानेही केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले होते लक्ष्मण सिंह?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहताना लक्ष्मण सिंह म्हणाले होते की, “राहुल गांधी आणि रॉबर्ट वढेरा अपरिपक्व आहेत. त्यांच्या अपरिपक्वतेचे परिणाम देश भोगत आहे.” त्यांनी असेही म्हटले की रॉबर्ट वाड्रा हे राहुलजींचे मेहुणे आहेत. मुस्लिमांना रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी नसल्याने हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. आपण असे बालिश कृत्य किती काळ सहन करणार? राहुल गांधींनी बोलण्यापूर्वी विचार करावा, ते विरोधी पक्षनेते आहेत.
Congress President Mallikarjun Kharge has expelled Laxman Singh, Former MLA, Madhya Pradesh, from the primary membership of the party for a period of six years due to his anti-party activities. pic.twitter.com/G8jBZBqVQx
— ANI (@ANI) June 11, 2025
‘ओमर अब्दुल्ला यांचे दहशतवाद्यांशी संबंध
लक्ष्मण सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत. लक्ष्मण सिंह यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ओमर अब्दुल्ला सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पक्षाविरोधी आणि नेत्यांबाबत वादग्रस्त विधानांची मालिका सुरु करणाऱ्या लक्ष्मण सिंह यांच्यावर अखेर कॉंग्रेस पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या वादग्रस्त विधानांनंतर लक्ष्मण सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तारिक अन्वर यांनी ९ मे रोजी लक्ष्मण सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये म्हटले होते की, तुमच्या विधानांमुळे काँग्रेसच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला गंभीर नुकसान झाले आहे आणि तुमच्या अलीकडील विधानाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यानंतर आता लक्ष्मण सिंह यांना कॉंग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.