दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यानंतर देशामध्ये एनडीएचे सरकार येणार की इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. 400 पारचा नारा देऊन भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांची साथ घ्यावी लागली आहे. दिल्लीतील जुन्या संसदभवनमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी प्रस्तावाला पाठिंबा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास शायरी म्हटली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोदींना पाठिंबा
दिल्लीमध्ये एनडीए आघाडीच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांसह सर्व देशातील भाजपचे विजयी उमेदवार उपस्थित होते. यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांची लक्षणीय उपस्थिती होती. बैठकीमध्ये राजनाथ सिंह यांनी संसदीय गटनेते पदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाचं अमित शाह यांनी समर्थन केले. तसेच प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी देखील अनुमोदन केले. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी देखील नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रस्तावाला होकार दिला.
यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “जनतेने विकासाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्ष फक्त राजकारण करायचे, त्यांना जनतेने घरी बसवले आहे. गेल्या 10 वर्षात मोदींनी देशाला आघाडीवर नेले आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले,” त्याचबरोबर शायरी देखील म्हटली.
मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसे नदियों ने सींचा है,
बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खींचा है।
मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे।
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे।
अशी शायरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या संसद भवनामध्ये गायली.






