
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरु असलेला पूलच कोसळला, सहा जणांचा मृत्यू
हमीरपूर : उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. मावई जारला कुराराशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेला हा पूल अचानक कोसळला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत वित्तहानी आणि जीवितहानी देखील झाली आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. इतर तीन जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली, जेव्हा पुलाचा एक भाग अचानक कोसळला. मावई जार आणि कुराराला जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम सुरू होते. माहिती मिळताच, पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी बचावकार्याची पाहणी केली आहे. आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जात आहे.
दरम्यान, अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक तांत्रिक पथकही बोलावण्यात येत आहे, जेणेकरून पुलाच्या गुणवत्तेत कमतरता होती की पूल इतर कोणत्यातरी कारणामुळे कोसळला, हे शोधून काढता येईल.
वादळामुळे घडली दुर्घटना
उत्तर प्रदेशात मध्यरात्री आलेल्या वादळाने हमीरपूरमध्ये हाहाकार माजवला. बेटवा नदीवर बांधण्यात येत असलेला एक पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही जण खांबांवरही अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ते मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
सिद्धपीठावर पुरामुळे अनेक जण गेले वाहून
सहारनपूरमधील शाकंभरी सिद्धपीठावर आलेल्या अचानक पुरामुळे हाहा:कार माजला आहे. अनेक दुकानांतील साहित्यांसह भाविक वाहून गेले आहेत. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा सिद्धपीठाच्या परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे सर्वत्र घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर पाणी अचानक वेगाने खाली आले. काही कळण्यापूर्वीच पाण्याने अनेक दुकाने आणि लोकांना आपल्यात सामावून घेतले. भाविकांमध्ये आक्रोश आणि किंकाळ्यांच्या गजरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बचावकार्य सुरू आहे.