
रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युलवर IndiGo ची मोठी घोषणा
इंडिगोने असेही म्हटले आहे की, या कालावधीत तिकीट रद्द करण्यासाठी किंवा वेळापत्रकात बदल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एअरलाइनने देशभरातील हजारो हॉटेल आणि वाहतुकीची व्यवस्था केली आहे. विमानतळांवर जेवण आणि नाश्त्याची देखील व्यवस्था केली जात आहे आणि शक्य असेल तेथे ज्येष्ठ नागरिकांना लाउंज अॅक्सेस दिला जात आहे.
आज (5 डिसेंबर) ७५० हून अधिक विमान उड्डाणांवर परिणाम झाला. या आठवड्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रवासी तासन्तास अडकून पडले होते. दिल्लीमध्ये परिस्थिती विशेषतः भयानक होती, जिथे सर्व २३५ इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली.
“आम्ही मनापासून माफी मागतो आणि तुमच्यापैकी अनेकांसाठी गेले काही दिवस किती त्रास सहन करावा लागला हे आम्ही समजू शकतो,” असे विमान कंपनीने म्हटले आहे. तसेच या संकट रात्रीतून संपत नाही, पण तोपर्यंतच्या काळात इंडिगो तुमची मदत करण्यासाठी आणि आमची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमच्या क्षमतेनुसार सर्वकाही करेल, असेही विमान कंपनीने म्हटले आहे.
इंडिगोने या संकटाची कारणे अचानक वैमानिकांची कमतरता, हिवाळ्यातील वेळापत्रक, तांत्रिक बिघाड आणि विमान वाहतूक व्यवस्थेतील गर्दी अशी असल्याचे सांगितले. एअरलाइनने असेही म्हटले आहे की विद्यमान FDTL (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) नियमांमुळे वैमानिकांची कमतरता निर्माण झाली, ज्यामुळे गर्दीच्या वेळी ऑपरेशन्समध्ये आणखी व्यत्यय आला.
डीजीसीएने याबाबतची सूचना जारी केली आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, “अनेक विमान कंपन्यांच्या कामकाजात सुरू असलेला व्यत्यय आणि विमान कंपन्यांकडून मिळालेल्या विनंत्या लक्षात घेता, ‘साप्ताहिक सुट्ट्या’ बाबतचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात येत आहे.”
डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यात त्यांना विमान कर्मचाऱ्यांसाठी अधिक विश्रांतीचा वेळ निश्चित करण्यास सांगितले. पूर्वी पायलट आणि कर्मचाऱ्यांसाठी सहा दिवसांचा रात्रीचा शिफ्ट रोस्टर कमी करून दोन करण्यात आला. रोस्टर बदलामुळे, क्रू सदस्य वेळेवर ड्युटीवर हजर राहू शकले नाहीत, परिणामी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. डीजीसीएच्या या आदेशाचा इंडिगो एअरलाइन्सवर सर्वाधिक परिणाम झाला. गेल्या चार दिवसांत, इंडिगोने १,००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत आणि बहुतेक उड्डाणांना विलंब होत आहे. विमानतळांवर प्रवाशांना येणाऱ्या वाढत्या अडचणी पाहून, डीजीसीएने आता आपला आदेश मागे घेतला आहे.
डीजीसीएने क्रू मेंबर्ससाठी फ्लाइट वेळेवर मर्यादा घातल्या. या मर्यादेनुसार, क्रू मेंबर्स दिवसाला फक्त आठ तास, आठवड्याला ३५ तास, महिन्याला १२५ तास आणि वर्षाला १,००० तास उड्डाण करू शकतात. डीजीसीएने या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले.