nupur sharma
नवी दिल्ली – प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य करून वादात सापडलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शर्मा यांनी 8 राज्यांमध्ये दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे. शर्मा यांनी याआधी 1 जुलै रोजी दिलासा मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने ती ऐकण्यास नकार दिला.
1 जुलै रोजी नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला होता. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही कडक शब्दांत सुनावले होते. कोर्ट म्हणाले- ‘तुमच्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली आहे. तुम्ही उशिरा माफी मागितली, तीही या अटींसह की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी ते विधान मागे घेत आहे. तुम्ही राष्ट्रीय वाहिनीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.
नुपूर यांनी दाखल केलेल्या नव्या याचिकेत न्यायालयाच्या निरीक्षणानंतर त्यांच्या जिवाला धोका आणखी वाढल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर 8 राज्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांत त्यांना अटकेपासून दिलासा द्यावा. केंद्राव्यतिरिक्त महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि आसाम या राज्यांना याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे.