विदेशात पाकचा बुरखा फाडणाऱ्या शिष्टमंडळाच्या हाती नक्की काय लागलं? PM मोदींनी घेतली भेट
भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात घेतलेली ठाम भूमिका मांडणयासाठी विदेशात गेललं बहुपक्षीय संसदीय शिष्टमंडळ अनेक देशांच्या दौर्यानंतर भारतात परतलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर या शिष्टमंडळाने भारताची दृढ भूमिका जागतिक समुदायासमोर मजबूतीने मांडली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांच्या दौऱ्यातील अनुभव शेअर करत आपले अभिप्राय दिले.
“…येणाऱ्या काळात संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो”; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला अखेरचा इशारा
या महत्त्वपूर्ण मिशनमध्ये विद्यमान खासदार, माजी खासदार आणि माजी राजनयिकांचा समावेश होता. सदर शिष्टमंडळाने ३३ देशांसह युरोपियन युनियनचा दौरा केला. केंद्र सरकारने या सात संसदीय प्रतिनिधिमंडळांच्या कार्याचे याआधीच कौतुक केले आहे. या मिशनमध्ये ५० पेक्षा जास्त सदस्य सहभागी होते, यामध्ये बहुतांश विद्यमान खासदार होते.विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वीच या शिष्टमंडळाची भेट घेतली असून दहशतवादाविरोधातील या सामूहिक प्रयत्नांचे विशेष कौतुक केले आहे.
या प्रतिनिधिमंडळांपैकी चारचे नेतृत्व सत्ताधारी पक्षातील भाजपचे रविशंकर प्रसाद व बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय झा आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी केले. उर्वरित तीन प्रतिनिधिमंडळांचे नेतृत्व विरोधी पक्षांतील काँग्रेसचे शशी थरूर, डीएमकेच्या कनिमोळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) च्या सुप्रिया सुळे यांच्याकडे होते.
विशेष म्हणजे, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे देखील या मिशनचा भाग होते. त्यांनी बहरीन, कुवैत, सौदी अरेबिया आणि अल्जेरिया या देशांच्या दौऱ्यात सहभाग घेतला. ओवैसी म्हणाले, “राजकारणात कधी फुले तर कधी दगड मिळतात. परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करणे हा आमचा अहंभाव नाही, तर ही जबाबदारी आहे जी आम्ही पार पाडत आहोत.”
ओवैसी यांनी सांगितले की, सौदी अरेबियामध्ये ४० देशांचा एक महत्त्वाचा इस्लामिक संघटना आहे, जिथे भारताचे मत मांडणे हे अत्यंत गरजेचे होते. त्यांनी संविधानाचा दाखला देत सांगितले की, “आमच्या संविधानात लिहिलं आहे ‘We the people’, हीच भारताची खरी ताकद आहे.” त्यांनी आशा व्यक्त केली की भाजप सरकार या सामूहिक शक्तीला ओळखेल आणि याला अधिक बळ देईल.
या दौऱ्यात माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद आणि सलमान खुर्शीद यांसारखे अनुभवी नेते देखील सहभागी झाले होते. त्यांच्या अनुभवामुळे या मिशनच्या विश्वासार्हतेत मोठी भर पडली.या संसदीय मिशनमधून भारताला जागतिक स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवादाचे वास्तव उघड करण्याची संधी मिळाली आहे. हा प्रयत्न केवळ केंद्र सरकारचा नव्हे, तर संपूर्ण राजकीय व्यवस्था एकत्र येऊन भारताच्या हितासाठी उभी राहत असल्याचे एक सकारात्मक उदाहरण ठरले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात राष्ट्रीय एकतेचा आणि सर्वपक्षीय सहभागाचा हा अभूतपूर्व प्रयत्न भविष्यात भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.