पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी संविधानावरील चर्चेदरम्यान आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आणीबाणीमुळे कॉंग्रेसच्या कपाळावरील पाप कधीच धुतले जाणार नाही असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर जहरी टीका केली. पंतप्रधान आपल्या या भाषणात म्हणाले, 25, 50 आणि 75 वर्षांना प्रत्येक देशात खूप महत्त्व असते. पण ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशात संविधान हिसकावले गेले होते. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि घटनात्मक व्यवस्था रद्द करण्यात आली. देशाचे तुरुंगात रूपांतर झाले. नागरिकांचे हक्क हिरावले गेले काँग्रेसच्या कपाळावरील हे पाप कधीच धुतले जाणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, जगात ज्यावेळी लोकशाहीची चर्चा केली होईल. काँग्रेसच्या या पापाची चर्चा नक्कीच होईल. कारण त्यावेळी लोकशाहीचा गळा घोटला गेला होता. भारतीय राज्यघटनेच्या संस्थापकांची तपश्चर्या नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याला कुलूप लावण्यात आले होते.
नेहरूंपासून राजीव गांधी , राहुल गांधी यांच्यावर निशाणा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहरूजींनी जे सुरू केले, ते इंदिराजींनी पुढे नेले आणि राजीवजींनी ते मजबूत करत त्याला समर्थन देऊन त्याचे पालनपोषण केले. कारण संविधानाशी छेडछाड करण्याची ही सवय खूप खोलवर रुजली होती. आता पुढची पिढीही या छेडछाडीत अडकली. असे म्हणत त्यांनी नेहरु गांधी परिवारावर निशाणा साधला.
लोकशाहीचा घोर अवमान
निवडणूक प्रकरणात इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल देणारे न्यायमूर्ती एच.आर. खन्ना हे रोषाचे लक्ष्य बनले. न्यायमूर्ती खन्ना हे ज्येष्ठतेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याच्या रांगेत होते आणि त्यांना जाणूनबुजून सरन्यायाधीशपद देण्यात आले नाही. हा संविधान आणि लोकशाहीचा घोर अवमान होता.
देशाच्या एकात्मतेच्या मूळ भावनेवरच आघात
पंतप्रधान म्हणाले की , “मला अत्यंत दु:खाने सांगावे लागते की, संविधान तयार करणाऱ्यांच्या मनात एकात्मतेची भावना होती, मात्र स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेच्या मूळ भावनेवरच आघात झाला. आणि गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये वाढलेले लोक विविधतेतील एकतेऐवजी विरोधाभास शोधत राहिले.
हा संविधानाचा आदर
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले, संविधान लागू होऊन ज्यावेळी 50 वर्षे झाली त्यावेळी योगायोगाने मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी संविधान सजवलेल्या हत्तीवर स्वार होते आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या पायाखाली चालत होते. हा संविधानाचा आदर आहे. आणि आज संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपण संविधान दिन साजरा करत आहोत. देशवासीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात आम्ही व्यस्त आहोत.
आमच्या सरकारच्या निर्णयांमध्ये भारताची एकता मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. कलम 370 हा एकात्मतेला अडथळा होता आणि म्हणून आम्ही ते जमीनदोस्त केला आहे.