सौजन्य - सोशल मिडीया
रांजणी/रमेश जाधव : आंबेगाव तालुक्याचे आमदार म्हणून सलग आठ वेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि अनुभवाचा मंत्रिपदाच्या रूपाने राज्यातील जनतेला फायदाच होईल अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे. गेली 25 वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वळसे पाटलांना आजच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाचे स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा फॉर्मुला तयार झाला असून, रविवारी (दि.१५ ) नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुतीच्या आमरारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला दहा मंत्रिपदे मिळाली असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले आणि आंबेगाव तालुक्याचे सलग आठ पंचवार्षिक निवडणुकीत आमदारकीचे प्रतिनिधित्व केलेल्या आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या ३५ वर्ष राष्ट्रवादीचे नेते म्हणून काम करत असताना आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या आंबेगांव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते असल्याने राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अशाही परिस्थितीत अजित पवारांचे वळसे पाटील हे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने आणि राजकारणाची जाण असलेले नेतृत्व म्हणून वळसे पाटील यांची ओळख असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विविध पदाच्या सांभाळल्या जबाबदाऱ्या
यापूर्वी आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षण त्याचबरोबर उत्पादन शुल्क, सहकार आणि गृहमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत साशंकता व्यक्त केली जात असली तरी वळसे पाटलांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी स्वतः अजित पवार आग्रही असल्याचे समजते.
हे सुद्धा वाचा : मनसे महायुतीत सामील होणार? ‘हा’ बडा नेता फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
नवीन स्थापन झालेल्या महायुतीच्या नवनिर्वाचित सरकारचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर येथे आज रविवार (दि. १५)सुरू होत आहे. महायुतीच्या सर्वच पक्षातील संभाव्य मंत्री पदाचे दावेदार असलेले आमदार नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व करत असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याने आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.