
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासून ईडीने संजीव अरोरा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही संबंधित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर अरोरा यांना अटक केली.
या कारवाईपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे भगवंत मान यांनी म्हटले.
दरम्यान, मनीष सिसोदिया यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली. “ईडीच्या डायरेक्टरपासून चपराशापर्यंत सर्वांना पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र पंजाब झुकणारा नाही,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Krishna Swaminathan : भारतीय नौदलाची धुरा आता नव्या हाती; कोण आहेत नवे व्हाईस ॲडमिरल जाणून
संजीव अरोरा यांच्या अटकेनंतर पंजाबमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आम आदमी पक्षाने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा दावा ‘आप’कडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या अटकेमुळे पंजाबच्या राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ईडीकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, अरोरा यांना न्यायालयात कधी हजर केले जाते आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते, याकडे आता राजकीय वर्तुळासह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.