मध्यप्रदेश: राम प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहामध्ये राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. यावेळी मात्र कॉंग्रेसच्या कोणत्याच नेत्याने मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. यावर अनेकदा राजकारण रंगताना दिसून येत असून आता भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राम मंदिराचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले होते. यावरून भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करत माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे. ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. राहुल गांधी उज्जैन येथे बाबा महाकाल दर्शन घेतले आहे. यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो न्याय यात्रेवर निशाणा साधला. “उज्जैन ही देवदर्शन करण्याची नगरी आहे. त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, त्यांना पश्चाताप व्हायला हवा की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पक्षाने नाकारले. जनतेची माफी मागायला हवी,” अशी मागणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली
राहुल गांधी यांचे महाकाल दर्शन आणि भारत जोडो न्याय यात्रा याबाबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “देवदर्शनामुळे काही होणार नाही. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी दिशाहीन आहेत. राहुल गांधी स्वतःला आणि पक्षाला योग्य दिशा दाखवू शकत नाहीत. ते देशाला काय दिशा देणार,” असा प्रश्न शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.