नवी दिल्ली – प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य करून वादात सापडलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकेला 10 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीसही बजावली आहे. सुनावणीदरम्यान नुपूर यांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या हत्येचा कट पाटणा येथे पाकिस्तानातून रचल्याचे उघड झाले आहे.
न्यायालय पुढील सुनावणीदरम्यान सर्व प्रकरणे हस्तांतरित करण्याचा विचार करू शकते. नुपूर यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान हे प्रकरण दिल्ली हायकोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, असे म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
कोर्टातील सुनावणीदरम्यान अधिवक्ता मानवेंद्र सिंह म्हणाले की, नुपूर यांना कलम 21च्या आधारे दिलासा मिळायला हवा. यासाठी त्यांनी अजमेरच्या खादिम चिश्तींच्या व्हिडिओसह अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. न्यायाधीशांनी विचारले- असेही झाले आहे का?