
Sonam Wangchuk, Safdarjung Hospital, Delhi Protest, Sonam Wangchuk Hunger Strike Delhi
Sonam Wangchuk hunger Strike: शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर-मंतर मैदानातून उचलून नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली डी. आंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली आहे. रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रत देण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर वांगचुक यांच्यावर देखरेख करणाऱ्या नियमित डॉक्टरांनाही त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही, असा आरोपही गितांजली आंगमो यांनी केला आहे.
गितांजली आंगमो यांनी पत्रात म्हटले आहे की, काल सायंकाळी वांगचुक यांची पोटॅशियम पातळी ४.३ इतकी होती. ती २.९ पर्यंत घसरल्याने त्यांच्या कुटुंबात चिंता वाढली आहे. पारदर्शकतेच्या अभावाचा हवाला देत, त्यांनी चांगल्या उपचारांसाठी त्यांना दुसऱ्या वैद्यकीय केंद्रात हलवण्याची आणि डिस्चार्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, रुग्णालय आणि जंतर मंतरच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
पत्रानुसार, शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी दुपारी 4.16 वाजता झालेल्या तपासणीत वांगचुक यांची पोटॅशियमची पातळी 4.3 वरून 2.9 पर्यंत घसरल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या प्रकृतीत झालेल्या या अचानक बिघाडाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
वांगचुक यांच्या सहकारी गीतांजली डी. आंगमो यांनी आरोप केला की, रुग्णालय प्रशासनाकडे वैद्यकीय चाचण्यांचे डिजिटल आणि हार्ड कॉपी अहवाल मागवूनही ते उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. तसेच गेल्या 20 दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या नियमित डॉक्टरांनाही त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
रुग्णालयाकडून सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय चाचण्याचे अहवाल मागुनही न मिळाल्यामुळे आमचा रुग्णालय प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे हे. त्यामुळे अधिक चांगले उपचार आणि अचूक वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना दुसऱ्या वैद्यकीय केंद्रात हलवण्याची तयारी सुरू असून, त्यासाठी आवश्यक औपचारिकता तातडीने पूर्ण करण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला करण्यात आली आहे.
उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्यानंतर सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जंतर-मंतर, रुग्णालय परिसर आणि आसपासच्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार सोनम वांगचुक यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात नेत असताना काही आंदोलकांनी प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली. तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावत, कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. जंतर-मंतर परिसर शांततेने रिकामा करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.