दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आजची चौकशी संपली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) ही चौकशी सुरु आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी केली. ईडीने सोनिया गांधी यांची तीन दिवस एकूण ११ तास चौकशी केली आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्याआधी २१ जुलै रोजीदेखील ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप असून त्याविषयी चौकशी सुरु आहे.
[read_also content=”औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात, १ ऑगस्टला सुनावणी https://www.navarashtra.com/maharashtra/aurangabad-naming-sambhajinagar-dispute-to-be-heard-in-high-court-nrgm-308678.html”]
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांनी ‘यंग इंडिया’ आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तास चौकशी केली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेसने आजही देशभरात सत्याग्रह आंदोलन केले. मंगळवारीदेखील सोनिया गांधी यांच्या चौकशीच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले होते. दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

