(Photo - X)
अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरू असतानाच विदर्भात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेतील 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.
याशिवाय अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांचे सहकारी तसेच प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष आणि कर्नाटकातील बेळगाव येथील विविध पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईतील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसची राजकीय ताकद कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले आहे.
पक्षात दाखल झालेल्या नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. दर्यापूरच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाला महायुती सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले. शेतकरी, दिव्यांग, वंचित आणि सर्वसामान्य घटकांसाठी कडू यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला या पक्षप्रवेशामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू, आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘गोरे बाईंच्या नावात ‘नि’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते’; सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला

