चेन्नई : लोकसभा निवडणुकीपूर्वी चेन्नईतील तांबरम रेल्वे स्थानकावर 4 कोटी रुपयांसह तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचाही समावेश आहे. हे लोक चार बॅगमध्ये चार कोटी रुपयांची रोकड घेऊन जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे तिघेही ट्रेनने तिरुनेलवेलीला जात होते. त्यानंतर भरारी पथकाने त्याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. आरोपींपैकी सतीश हा भाजपाचा कार्यकर्ता आणि एका खासगी हॉटेलचा व्यवस्थापक आहे. त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल रोख घेऊन जात होते. सूत्रांचे म्हणणे आहे की, सतीशने तिरुनेलवेली भाजपचे खासदार उमेदवार नैनार नागेन्टिरन यांच्या सूचनेनुसार रोख घेऊन जात असल्याची कबुली दिली आहे.
नेपाळी चलनाचाही समावेश
बिहारच्या गोपालगंजमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी सीम कार्ड आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची एटीएसतर्फे चौकशी करण्यात येत आहे. या सीमकार्डद्वारे लोकसभा निवडणुकीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही संशय आहे. ही सीमकार्ड दिल्लीहून विमानाने गोरखपूर विमानतळावर आणण्यात आली होती. त्यानंतर नेपाळमधून पोहोचलेल्या बंगालमधील मालदा जिल्ह्यातील तीन युवकांनी हे सीमकार्ड ताब्यात घेतले होते.