लालूंच्या निकटवर्तीयाला 'ईडी'चा दणका; तब्बल 113 कोटींची मालमत्ता जप्त
पाटणा : देशाचे माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय अमित कात्याल आणि त्यांच्या कंपन्यांची एकूण 113 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. याबाबतची कारवाई सक्तवसुली संचालनालयाने केली. ईडीने हरियाणातील गुरुग्राममधील 70 एकर जमीन आणि सदनिका, मुंबईतील काही घरे, दिल्लीतील एक फार्म हाऊस आणि सुमारे 113 कोटी रुपयांच्या ठेवींची प्रमाणपत्रे मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत जोडण्यात आली आहेत.
हेदेखील वाचा : देशाचे माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन हस्तांतरित केल्याप्रकरणी चौकशी करत असताना ईडीने गेल्या वर्षी अमित कात्याल यांना अटक केली होती. अमित कात्याल यांच्यावर ही संलग्नता कारवाई दिल्ली-गुरुग्राममध्ये फ्लॅट खरेदीदारांच्या पैशांच्या गैरव्यवहारासंदर्भात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात करण्यात आली आहे.
अमित कात्याल, क्रिश रियलटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रह्मा सिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणात 113.03 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) 6 ऑगस्ट रोजी आदेश जारी करण्यात आला होता.
अनेक मालमत्ता बेनामी संचालकांच्या नावावर
संलग्न मालमत्तांमध्ये गुरुग्राममधील सेक्टर 63 आणि 65 मधील 70 एकर जमीन, क्रिश प्रोव्हिन्स इस्टेट नावाच्या रिअल इस्टेट प्रकल्पातील पाच फ्लॅट्स आणि गुरुग्राममधील किश फ्लोरेन्स इस्टेटमधील सात फ्लॅट्स बेनामी संचालकांच्या नावावर आहेत. मुंबईत एका बेनामी कंपनीचे दोन फ्लॅटही जप्त करण्यात आले आहेत.
मार्चमध्ये टाकण्यात आला छापा
ईडीने मार्चमध्ये छापेमारीची कारवाई केली होती. यावर्षी मार्चमध्ये याप्रकरणी छापे टाकले होते आणि 200 कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला होता.
हेदेखील वाचा : दोघे गरजवंत येताहेत एकत्र; बच्चू कडूंना पर्याय हवाय आणि राष्ट्रवादीला विदर्भात चेहरा